- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना खापा,ता.सावनेर, पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खेकरानाला चोरखैरी रायवाडी मार्गावर काल,मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली.बिबट्या रोड ओलांडत असतांना त्याला वाहनाने धडक दिली असावी; अशी शक्यता वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.खेकरानाला चोरखैरी – रायवाडी मार्गावर बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी सकाळी काही नागरिकांनी वनसंरक्षक ऐश्वर्या शिंदे व खाप्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन आठवले यांना दिली.त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांनी क्षेत्र सहाय्यक सतीश गडलिंगे व सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पाहणी केली. सहायक वनसंरक्षक (तेंदू व कॅम्पा) विजय गंगावणे, मानद वन्यजीव रक्षक अविनाश लोंढे यांनीही घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली.
या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा केल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश फुलसुंगे, डॉ.बी.डी.कोहड व डॉ.मुकुंदा जोगेकर यांच्या चमूने मृत बिबट्याचे पोस्टमार्टम केले.त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया व सोपस्कार पूर्ण करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.यावेळी वनरक्षक कडू कुकलारे,साहेबराव शेलार,पी.भंडारे,एन.गिरी,बी.राठोड,वनमजूर बंडू सोनटक्के,राजू भसराम व चालक पंकज कोल्हे आदी वनविभागाचे कर्मचारीही उपस्थित होते. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ चे कलम ३९, ९ अन्वये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून वनविभागाने तपासाला सुरुवात केली आहे.
मृत बिबट्याचे वय अंदाजे दीड वर्ष असल्याची माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली.सावनेर तालुक्यातील खेकरानाला,रायवाडी हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त असून,या भागात वाघ,बिबट आणि इतर वन्यप्राण्यांचे वास्तव्य व वावर आहे.याच परिसरात खेकरानाला जलाशय असून,प्राण्यांना पिण्यास मुबलक पाणी मिळते.खापा रायवाडी हा मार्ग पुढे मध्य प्रदेशला जोडला असल्याने या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते.येथील वन्यप्राणी नेहमी हा रस्ता ओलांडतात.
- Advertisement -