उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- गेली चार महिन्यांपासून देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या पूर्वी झालेल्या व सुरू असलेल्या वृक्ष लागवडीच्या भ्रष्टाचारा संदर्भात लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते सत्यवान रामटेके यांनी सर्वांचे पितळ उघडे पाडण्याचा प्रयत्न केला आहे.अशातच काहीजण नवनवीन फंडे वापरून टोलवा-टोलवी करून ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका अनेकजण बजावतांना दिसून येत आहेत.अशाच प्रकारची भूमिका गडचिरोली सामाजिक वनीकरण विभागाचे बाबु कामतवार यांनी दर्शविल्याचा प्रकार हल्ली उघडकीस आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते सत्यवान रामटेके यांनी देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या देसाईगंज,कुरखेडा,आरमोरी व कोरची तालुक्यातील वृक्ष लागवडीच्या साईटवर झालेल्या संपूर्ण भ्रष्टाचारा संदर्भात २ मे २०२३ व ३ ऑगस्ट २०२३ रोजी आमरण उपोषण केला होता.त्यानुसार चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे लिखित पत्र देण्यात आले.मात्र अजून पावेतो कुठल्याही प्रकारची चौकशी वा कार्यवाही करण्यात आली नसल्याने परत पुन्हा तिसऱ्यांदा गडचिरोली सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयासमोर रामटेके यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.आमरण उपोषणाचा इशारा देताच समिती गठीत करण्यात आली.त्यानुसार पत्रव्यवहार करण्यात येत आहे. पत्रव्यवहार तर करण्यात आला; मात्र दिलेल्या पत्रावरून स्पष्ट दिसून येते की,गडचिरोली सामाजिक वनीकरण विभागाचे ‘बाबू’ च विभागीय वन अधिकारी झाले की काय? असे निदर्शनास येऊ लागले आहे.गडचिरोली सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयात बाबु असलेले कामतवार हे विभागीय वन अधिकाऱ्यांच्या हुद्द्यावर नसतांनाही विभागीय वन अधिकारी म्हणून सही करून पत्रव्यवहार करणे कितपत योग्य आहे.यावरून असे स्पष्ट होते की,स्वतः च्याच मन मर्जीने पत्र तयार करून विभागीय वन अधिकारी हुद्द्यावर सही करून उपोषण कर्त्याच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे.
महत्वाचे म्हणजे,एखाद्या चौकशी सारख्या गंभीर पत्रावर स्वतः बाबू सही करून पत्रव्यवहार केले जाते. तर मग विभागीय वन अधिकारी करतात तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.एखाद्या गंभीर पत्रावर असे केले जात असेल तर इतर अन्य बाबींवर काय केले जात असावे? अशी शंका बळावली असल्याने अशांवर कारवाई होणे गरजेचे आहे.