उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- स्वतःची हुशारकी दाखवणारे व मीच मोठा व दुसरा छोटा असे करणारे; एक ना एक दिवस दुसऱ्यांसाठी खोदलेल्या खड्ड्यात स्वतःच पडणार असल्याची प्रचिती हल्ली निदर्शनास आली आहे.काही वर्षांपूर्वी देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाचे तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी व सध्याच्या घडीला पवनी येथील कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल बारसागडे यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत नागपूरच्या प्रादेशिक वनसंरक्षकांनी पदावरून निलंबित केले आहे.याबाबत महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल व वनकर्मचारी संघटनेने नागपूरचे वन भवन गाठत बारसागडे यांच्याबाबतच्या तक्रारींचा पाढाच वाचला होता.या कारवाईने वन विभागात पुन्हा नवीन चर्चेला उधाण आले आहे.
संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक वनसंरक्षक श्री. लक्ष्मी यांची भेट घेतली होती.तसेच निवेदनही दिले होते.त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर खातखेडा प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ शकते; अशी शक्यताही शिष्टमंडळाने वर्तविली होती.शिष्टमंडळाने श्री.लक्ष्मी यांना दिलेल्या निवेदनातून अनेक गंभीर तक्रारी केल्या होत्या. वनपरिक्षेत्रात गस्त करण्याकरिता शासकीय वाहन मागितले असता; इंधनाचे कारण सांगून देत नाहीत; स्वखर्चाने इंधन भरा आणि वापरा; असे सांगतात.वनपरिक्षेत्रातील कर्मचारी क्षेत्रीय कामे करत असताना त्यांना कोणतेही मार्गदर्शन करीत नाहीत; उलट त्यांच्यावर अविश्वास दाखवून मानसिक खच्चीकरण करतात.रात्री गस्तीच्या वेळी आवश्यक साहित्य,सेल बॅटरी,ट्रॅप कॅमेरा यासह अन्य साधनांची मागणी केली असता; ते देण्यास नाकारतात. मनुष्यबळ पुरवत नाहीत,भविष्यात काही अनुचित घटना घडल्यास यासाठी बारसागडे हेच जबाबदार राहतील; असेही या निवेदनात म्हटले होते.
गुडेगाव व खातखेडा येथील घटनेच्या वेळीही बारसागडे उपस्थित नव्हते.अधिकारी वर्गाला मारहाण प्रकरणही योग्य प्रमाणे हाताळता आले नाही. याशिवाय कर्मचाऱ्यांना मिळणारी गैरवर्तणूक, अपमानजनक वागणूक यामुळे जनसामान्यांमध्ये वन विभागाची प्रतिमा मलीन होत असल्याचेही शिष्टमंडळाने वनसंरक्षकांच्या लक्षात आणून दिले.नागपूर वनसंरक्षकांकडे पवनीचे वन परिक्षेत्र अधिकारी बारसागडे यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती.कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.निलंबन काळात त्यांचे मुख्यालय उपवनसंरक्षक भंडारा कार्यालय राहणार आहे.