उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाइन व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत.यामध्ये ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.अशातच तालुक्यातील धापेवाडा येथे ऑनलाइनच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.एका युवकाने मोबाइल मागविला असता,त्याच्या हातात पोस्टातील पार्सलमधून चक्क बेल्ट पडला.तथापि,फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने दवनीवाडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
गोंदिया तालुक्यातील धापेवाडा येथील शिवानंद भोजराज भेलावे या युवकाला एका मोबाइल क्रमांकावरून फोन आला.४ हजार ६०० रुपयांना मोबाइल फोन मिळेल,असे त्यावरून सांगण्यात आले. २१ मे रोजी पोस्ट ऑफिसमार्फत शिवानंद भेलावे याच्या नावाने एक पार्सल आले.सांगितल्यानुसार,चार हजार ६०० रुपये भेलावे याने पोस्ट ऑफिसमध्ये भरले व पार्सल घेतले.नंतर काही क्षणातच पोस्ट ऑफिसमध्येच हे पार्सल उघडून पाहिले असता, त्या पार्सलमध्ये मोबाइल फोन नाही, तर एक बेल्ट (कमरपट्टा) निघाला.यात ऑनलाइन फोनवरून फसवणूक झाल्याची तक्रार भेलावे याने दवनीवाडा पोलिसात केली आहे.
दरम्यान, ठाणेदार सतीश जाधव यांनी शाखा डाकपालास पत्र पाठवून सदर पार्सल आपल्या कोणत्या कार्यालयात,कोणत्या व्यक्तीकडून किंवा कंपनीकडून पाठविण्यात आले,त्यांच्याशी संपर्क करावा व भरणा केलेली रक्कम पुढे पाठवू नये; असे सांगितले आहे.

