- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-मोबाइलवर बोलण्याच्या नादात एका खासगी बँकेत शाखा व्यवस्थापक असलेल्या कार चालकाने दुचाकीने घरी परतणाऱ्या पती-पत्नीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की,पती आणि पत्नीचा जागीच मृत्यू झाला.विजय भगवान सावरकर वय ५३ वर्षे,रा.घरकुल सोसायटी,हरिहरनगर व सुरेखा सावरकर वय ४८ वर्षे अशी मृत दाम्पत्यांची नावे असून दोघेही नातीच्या वाढदिवसावरून घरी परत जात असतांनाच मध्यरात्रीच्या सुमारास सदरचा अपघात घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.कारचालक पंकज बाळकृष्ण डेकाटे वय ४७ वर्षे,चिमुरकर ले आऊट,न्यू नरसाळा,नागपूर याने अपघातानंतर मदत करण्याऐवजी कार सोडून घटनास्थळावरून पळ काढला.विशेष म्हणजे,तो दारूच्या नशेत गाडी चालवत होता.
विजय सावरकर व सुरेखा सावरकर यांची मुलगी प्राजक्ता व जावई नितीन कळंबे यांच्या मुलीचा बुधवारी पहिला वाढदिवस होता.नातीचा वाढदिवस असल्याने सावरकर दांपत्य दिघोरीतील आराधनानगर येथे कार्यक्रमासाठी गेले होते.कार्यक्रम आटोपल्यावर रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास ते दुचाकीने घराकडे जात होते.बेसा चौक ते पुरुषोत्तम बाजार चौकाजवळ एमएच ४९ बीडब्लू ४२२६ क्रमांकाच्या किया सोनेट कारच्या चालकाने त्यांना भरधाव वेगात येत समोरून धडक दिली.त्यात सावरकर दाम्पत्य खाली पडून गंभीर जखमी झाले.घटनास्थळावरून वन विभागाचे अधिकारी जात होते.आरोपी डेकाटेने त्यांच्या गाडीलादेखील कट मारला होता.सावरकर दांपत्याला जखमी अवस्थेत पाहून त्यांनी तातडीने दोघांनाही मेडिकल रुग्णालयात नेले.मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.भारतीय सैन्यात कार्यरत असलेले सावरकर यांचे जावई नितीन कळंबे यांच्या तक्रारीवरून कारचालक पंकज डेकाटे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली आहे.आरोपी पंकज डेकाटे हा महालात एका खासगी बँकेच्या शाखेत व्यवस्थापक आहे.तो दारूच्या नशेत होता.कार वेगात चालवत असतांना त्याला फोन आला.मोबाइल उचलण्याच्या नादात त्याचे कारवरील नियंत्रण सुटले व त्याने समोरून थेट सावरकर दाम्पत्याला धडक दिली.वेग इतका जोरात होता की डेकाटेची कार समोर जाऊन एका खांबालादेखील धडकली.प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
- Advertisement -

