उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- चंद्रपूर जिल्ह्यातील नोंभूर्णा तालुक्यात मिरची तोडणीसाठी नावेने जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील गणपूर रै.येथील महिला मजुरांवर चिनगंगा नदीपात्रात काळाने झडप घातल्याची हृदयद्रावक घटना काल, दिनांक- २३ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली.दरम्यान दोन महिलांचे मृतदेह सापडले असून चार महिलांचा सायंकाळी उशिरापर्यंत थांगपत्ता लागलेला नव्हता.पुष्पा मुक्तेश्वर झाडे वय ४५ वर्षे, जिजाबाई दादाजी राऊत वय ५५ वर्षे,अशी मृत महिलांची नावे असून या घटनेने गणपूर रै.गावावर शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार,गणपूर रै.सह परिसरातील महिला तसेच पुरुष मजूर नेहमीच चंद्रपूर जिल्ह्यात मिरची तोडणीसाठी जात असतात.नेहमीप्रमाणे गणपूर येथील पुष्पा मुक्तेश्वर झाडे वय ४५ वर्षे,जिजाबाई दादाजी राऊत वय ५५ वर्षे, रेवंता हरीचद्र झाडे वय ४० वर्षे,सुषमा सचिन राऊत वय २४ वर्षे,नायाबाई अशोक राऊत वय ४५ वर्षे, बुधाबाई देवाजी दाऊत वय ५८ वर्षे व सारूबाई सुरेश कस्तुरे या सात महिला मिरची तोडणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील गंगापूर टोक या गावात नावेने जात होत्या.दरम्यान,नदीपात्राच्या मधोमध गेल्यानंतर पाण्याचा प्रवाह व वाऱ्यामुळे नाव नदीपात्रात उलटली.यात सातही महिला पाण्यात वाहून गेल्या.यावेळी नावाड्याने पोहून बाहेर निघत सारुबाई कस्तुरे या महिलेचे प्राण वाचवित नदीकाठ गाठले.मात्र इतर महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या.घटनेची माहिती प्राप्त होताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.चामोर्शी पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळ गाठित शोध मोहीम राबविली.यादरम्यान पुष्पा झाडे,जिजाबाई राऊत या दोन महिलांचे मृददेह आढळून आले.मात्र सायंकाळपर्यंत पथकाला उर्वरित चार महिलांचा थांगपत्ता लागला नाही.रात्र झाल्याने शोध मोहिमेत अडथळा येत असल्याने मोहिम थांबविण्यात आली.
आज बुधवारला सकाळी पुन्हा मोहीम राबविण्यात आली.घटनास्थळी राकाँचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार,गणपूर रै.चे सरपंच सुधाकर गद्दे, उपसरपंच जीवन भोयर माजी पंस सदस्य सुरेश परसोडे,राकेश बेलसरे, प्रमोद भगत, विनोद गौरकर, पोंभुर्णा पंस सभापती अलका आत्राम घटनास्थळी दाखल झाले होते.घटनेची माहिती प्राप्त होताच चामोर्शी आपत्ती व्यवस्थान पथकाने बोटीच्या सहाय्याने शोध मोहीम राबविली. दरम्यान मदतीकरिता प्राणहिता (अहेरी) आपत्ती व्यवस्थापन पथकालाही मोटार बोटीसह पाचारण करण्यात आले. दोन्ही पथकाद्वारे संयुक्तरित्या मोहीम राबविण्यात आली असता दोन महिलांचे मृतदेह आढळून आले. मात्र सायंकाळपर्यंत उर्वरित चार महिलांचा शोध लागला नाही.रात्र झाल्याने सदर मोहीम थांबविण्यात आली आहे.

