- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-प्रियकराला त्याच्या प्रेयसीसोबत प्रेमविवाह करायचा होता.मात्र,त्याने प्रेसयीच्या मदतीने तिच्याच घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आणि त्या पैशातून मौजमस्ती केली.शेवटी या चोरीचे बिंग फुटले आणि प्रियकर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.ही घटना खापरखेडा येथे नुकतीच घडली,अटकेनंतर त्याच्याकडून एकूण ४ लाख २२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले, अशी माहिती ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कातलाम यांनी दिली.ललितकुमार परमार रा.खापरखेडा,ता.सावनेर असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे.फिर्यादी महिला ही चनकापूर,ता.सावनेर येथील रहिवासी आहे.फिर्यादीने तिच्या घरी चोरी झाल्याची तक्रार गुरुवारी २४ ऑक्टोंबरला पोलिसांत दाखल केली होती.चोरट्याने रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६ लाख १५ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.त्याअनुषंगाने खापरखेडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून प्रकरण तपासात घेतले.या चोरीशी फिर्यादीच्या मुलीच्या प्रियकराचा संबंध असल्याचे फिर्यादी व पोलिसांच्या लक्षात आले.
परिणामी,पोलिसांनी ललितकुमारला ताब्यात घेत विचारपूस केली.गुन्ह्याची कबुली देताच पोलिसांनी त्याला अटक केली.त्याच्याकडून ४ लाख २२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम ३०५,३३१ अन्वये गुन्हा दाखल करून तपास केला आहे.
फिर्यादीची मुलगी आणि ललितकुमारचे प्रेमप्रकरण दोन वर्षांपासून सुरु होते.प्रेमविवाह करण्याचा दोघांचा विचार होता.दोघांनाही मौजमस्ती करण्यासाठी पैशाची गरज असल्याने त्याने तिच्या घरातून टप्प्याटप्प्याने दागिने चोरून नेले आणि ते गहाण ठेवून पैशाची उचल केली.त्या रकमेत दोघांनी मौजमस्ती केली.काही रक्कम त्याने दारू पिणे आणि जुगार खेळण्यात खर्च केली,गहाण ठेवलेले दागिने सोडविण्यास त्याच्याकडे पैसे नव्हते.मध्येच दागिने गायब असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले आणि बिंग फुटले.
आरोपीने ६ लाख ७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि आठ हजार रुपये रोख असा एकूण ६ लाख १५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे पोलिस तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी आरोपींकडून पाच हजार रुपये रोख,तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र,चार ग्रामचे सोन्याचे कानातील दागिने,तीन तोळ्याचा सोन्याचा चपलाकंठी हार,एक तोळ्याची सोन्याची चेन,अडीच ग्रामची सोन्याची रिंग,तीन ग्रामचे सोन्याचे कानातील झुमके,पाच तोळ्याच्या चांदीच्या तोरड्या असा एकूण ४ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
- Advertisement -

