- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार जंगल परिसरात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना तीन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती.यानंतर मुंडीपार परिसरात वाघाचे पगमार्क आढळले असून या परिसरात वाघाचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून भरकटलेली वाघीण सध्या गोंदिया तालुक्यातील खरोबा पांगळी परिसरात वास्तव्यास आहे.वाघ वाघिणीची गोरेगाव आणि गोंदिया तालुक्यात दहशत निर्माण झाली असून वन व वन्यजीव विभागाने गावकऱ्यांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे.
गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार जंगल परिसर हा नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो.गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात एका वाघाचा वावर आहे.या वाघाचे शेतात काम करीत असलेल्या शेतकरी आणि मजुरांना अनेकदा दर्शन झाले आहे.दोन दिवसांपूर्वी या वाघाने एका शेतकऱ्याचा बळी घेतल्याने या परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर वन,वन्यजीव विभाग व सेवा संस्थेच्या सदस्यांनी या परिसरात वाघाचा वावर आहे का? याचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविली.दरम्यान,मुंडीपार परिसरात वाघाचे पगमार्क आढळले.त्यामुळे विभागाने जंगल परिसरात असलेल्या गोरेगाव तालुक्यातील गावांमध्ये मुनादी देऊन गावकऱ्यांना एकटे जंगलात व शेतशिवारात जाऊ नये; अशी सूचना केली आहे.तर नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून भरकटलेली वाघिणीचा वावर सध्या गोंदिया तालुक्यातील खरोबा पांगळी परिसरात आहे.
या वाघिणीला जंगलात परतावून लावण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.तसेच वाघिणीच्या हालचालीवर वन व वन्यजीव विभागाची चमू नजर ठेवून आहे.ही वाघीण व्याघ्र प्रकल्पात परत जातपर्यंत नागरिकांना धोका कायम आहे.त्यामुळे गोंदिया आणि गोरेगाव तालुक्यात वाघ,वाघिणीची दहशत असल्याचे चित्र आहे.गोंदिया तालुक्यातील खरोबा पांगळी परिसरात व्याघ्र प्रकल्पातून भरकटलेल्या वाघिणीचा वावर आहे.या वाघिणीला कॅलर आयडी लावली असून त्यावरून वाघिणीचे लोकेशन ट्रॅक करून तिच्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे.तसेच वन विभागाची चमू या परिसरात तळ ठोकून आहे.
- Advertisement -

