- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही शिक्षक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानदानाचे पवित्र कार्य निष्ठेने करत आहेत.शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासन कटिबद्ध असून शालेय पायाभूत सुविधांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही,अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज,गुरुवार १० सप्टेंबर रोजी ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शैक्षणिक गुणवत्ता,उपलब्ध पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयींची पाहणी केली.यानंतर सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षक सत्कार सोहळ्यात ते मार्गदर्शन करत होते.
याप्रसंगी आमदार डॉ.मिलिंद नरोटे,आमदार रामदास मसराम,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,अप्पर जिल्हाधिकारी संजय आसवले, शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर,माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे,प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रेरक उजगारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी,मुख्याध्या पक,शिक्षक,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
- शाळांना मंदिराप्रमाणे लोकसहभागातून समृद्ध करा👇
यावेळी मार्गदर्शन करतांना शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की,गावात ज्याप्रमाणे मंदिर उभारणी आणि विकासासाठी संपूर्ण गाव एकत्र येते,त्याचप्रमाणे शाळा हे ज्ञानमंदिर मानून तिच्या विकासासाठी माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी लोकसहभागातून पुढे आले पाहिजे.शिक्षकांच्या समर्पित प्रयत्नांतून जिल्हा परिषद शाळांचे चित्र सकारात्मकरीत्या बदलत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात शिक्षक प्रतिकूल परिस्थितीतही निष्ठेने ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील महत्त्वाचा घटक असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
- जीर्ण व धोकादायक शालेय इमारतींचे तातडीने निर्लेखन करा👇
शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी,स्वच्छतागृहे,पुरेशा वर्गखोल्या,क्रीडांगण,ई-लॅब आणि वाचनालय यांसारख्या मूलभूत व शैक्षणिक सुविधा दर्जेदार असाव्यात,असे निर्देश शिक्षणमंत्र्यांनी दिले.जिल्हा नियोजन समिती, सीएसआर निधी तसेच मानव विकास मिशनच्या माध्यमातून शाळांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील,असे त्यांनी सांगितले.
शाळा परिसरातील जीर्ण,निरुपयोगी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरणाऱ्या जुन्या इमारतींचे तातडीने निर्लेखन करून आवश्यकतेनुसार नवीन इमारतींचे प्रस्ताव व आराखडे सादर करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
- पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती; केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी👇
राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असून लवकरच रिक्त जागांवर शिक्षक रुजू होतील.त्यामुळे शिक्षकांची कमतरता दूर होण्यास मदत होईल.तसेच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यासोबत विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक सैनिकी प्रशिक्षणावरही भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
- शाळांना प्रत्यक्ष भेटी; विद्यार्थ्यांशी थेट संवाद👇
‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी रामनगर येथील पीएम श्री जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, आरमोरी रोडवरील प्लॅटिनम ज्युबली हायस्कूल, श्रीमती सिंधुताई पोरेड्डीवार हायस्कूल गोगाव,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोगाव तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आयएसओ आदर्श शाळा बोदली येथे प्रत्यक्ष भेटी दिल्या.
या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत शाळेत काय शिकवले जाते,शिक्षक कशा पद्धतीने शिकवतात,शाळेत कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत,तसेच विद्यार्थ्यांना आणखी कोणत्या सुविधा अपेक्षित आहेत,याची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनीही शिक्षणमंत्र्यांशी मनमोकळा संवाद साधला.
पीएम श्री जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,रामनगर येथे विद्यार्थ्यांचे वाचन आणि कविता गायन ऐकून शिक्षणमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.वर्गखोल्यांची कमतरता दूर करण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,गोगाव येथे शिक्षणमंत्र्यांनी वृक्षारोपण केले.दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सोयीसुविधांचा आढावा घेतला तसेच स्वच्छतागृहांसह शाळेतील मूलभूत सुविधांची पाहणी केली.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आयएसओ आदर्श शाळा,बोदली येथे विद्यार्थ्यांसोबत पोळा सण साजरा करून शिक्षणमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थिनींकडून राखी बांधून घेत त्यांनी विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण अनुभवले.यावेळी डिजिटल वर्ग आणि संगणक लॅबची पाहणी करून नादुरुस्त पॅनेल्स तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश दिले.शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात आलेल्या वॉल कंपाउंड,शेड तसेच पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनासंदर्भातील मागण्यांबाबत सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
- गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षकांचा गौरव👇
सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित कार्यक्रमात विविध परीक्षा,विज्ञान,क्रीडा आणि अन्य स्पर्धांमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच उपक्रमशील शिक्षकांचा शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
इस्रो शैक्षणिक सहल: बंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला(ISRO)शैक्षणिक भेट देणाऱ्या मोहुर्ली मॉडेल स्कूलची विद्यार्थिनी सन्ना शकील पठाण हिने इस्रोच्या शैक्षणिक भेटीचा तसेच प्रथमच केलेल्या विमानप्रवासाचा अनुभव आपल्या मनोगतातून मांडला.
‘इन्स्पायर अवॉर्ड’ : आदर्श इंग्लिश हायस्कूल, देसाईगंज येथील ध्रुव विनोद कोवे याचा नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी विशेष सत्कार करण्यात आला.
राज्य विज्ञान मेळावा : राज्य विज्ञान मेळाव्यात द्वितीय पारितोषिक प्राप्त नमन पेदापल्लीवार(इंदिरा गांधी विद्यालय,येनापूर) याचा सन्मान करण्यात आला.
क्रीडा व स्काऊट-गाईड : राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू आभा संग्रामे,खो-खो खेळाडू ध्रुव हलामी,राष्ट्रीय कबड्डीपटू श्रवण उसेंडी,कराटेपटू सार्थक गेडाम, वनिता पुंगाटी तसेच सलोनी करपे,वंशिका झंझाळ, कृष्णा नेरकर,रोशन काटवे आणि रमेश बन्सी या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
एनएमएमएस,नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा : एनएमएमएस परीक्षेत यश मिळविणाऱ्या वैष्णवी राऊत,स्वीटी उसेंडी,कृतिका गुरुनुले,प्रांजल भोयर यांच्यासह नवोदय व विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पूर्वा विनोद मडावी आणि श्वेता वासुदेव गेडाम यांचाही सत्कार करण्यात आला.
आदर्श शिक्षक व माजी विद्यार्थी संघ : प्रयोगशील शिक्षक दिलीप नाकाडे,मंगरमेंढा शाळेचे प्रवीण दोर्लीकर यांच्यासह जिल्ह्यातील उपक्रमशील व तंत्रस्नेही ‘आयडॉल शिक्षकां’चा शाल व गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
- Advertisement -

