उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १ ते १५ मे पर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम,१९५१ चे कलम ३७ (१) (३) लागू करण्यात आलेले आहे.जिल्ह्यात सीपीआय (माओवादी) या नक्षल संघटनेतर्फे फेब्रुवारी ते जून २०२४ या कालावधी दरम्यान टीसीओसी राबविण्यात येत असतो.यादरम्यान माओवाद्यांकडून हिंसक घटना, शासकीय कार्यालये, बांबु/बिट डीपो, दूरध्वनी टॉवर इत्यादींची जाळपोळ, भू- सुरुंग स्फोट घडवून आणणे, सुरक्षा दल/पोलिस पथक/पोलिस स्टेशनवर हल्ले करण्याचा प्रयत्न करणे, रस्त्यावर अडथळे निर्माण करून रहदारी बंद करणे, राजकीय व्यक्ती, शासकीय अधिकारी व पोलिसांना माहिती देणारे बातमीदार यांना लक्ष्य करणे इत्यादी कारवाया करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच १६ मार्च २०२४ पासून आदर्श आचार संहिता लागू झालेली आहे.१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला आहे.तसेच काही राजकीय पक्ष,संघटना व इतर नागरिक हे धरणे,मोर्चे, आंदोलने,सभा,मिरवणूक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १ ते १५ मे पर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम,१९५१ चे कलम ३७ (१) (३) लागू करण्यात आलेले आहेत; असे जिल्हा दंडाधिकारी गडचिरोली यांनी आदेशीत केले आहे.

