उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीप्रमाणेच आता विशेष मागास प्रवर्ग (ओबीसी) लाभार्थ्यांना मोदी ग्रामीण आवास योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला २०२३-२४ वर्षाकरिता ६ हजार ५४८ घरकुलाचे उद्दिष्ट दिले गेले आहे.यात ओबीसी प्रवर्गातील ६ हजार १३५ तर एसबीसी प्रवर्गाकरिता ४१३ घरकूल मंजूर करण्यात आले आहे. ओबीसींकरिता राज्यात प्रथमच घरकूल योजनेला प्रारंभ झाला असून लाभार्थी सद्यस्थितीत या योजनेच्या लाभासाठी कागदपत्रे गोळा करताना निदर्शनास येत आहेत.केंद्र व राज्य शासनाद्वारे घरकूल योजना राबविण्यात येत आहे.मात्र यात ओबीसी प्रवर्गाचा समावेश नव्हता.परिणामी ओबीसी लाभार्थी केवळ प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज सादर करीत होते.या योजनेअंतर्गत प्रथम एसटी, एससी लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जात असल्याने ओबीसी लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित राहावे लागत होते.ही बाब लक्षात घेत केंद्र व राज्य शासनाने मोदी ग्रामीण आवास योजना लागू करेली आहे.या योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ६ हजार ५४८ घरकुलाचा लाभ ओबीसींना देण्यात येणार आहे.
यामध्ये गडचिरोली तालुक्यात १ हजार ३७ घरकुल, आरमोरी ५९९, अहेरी ४८६, भामरागड १६, चामोर्शी १ हजार ९०१, धानोरा २४२, देसाईगंज ९६१, एटापल्ली ८६, कोरची ६६, कुरखेडा ५५५, मुलचेरा ६० तर सिरोंचा तालुक्यात ५३१ घरे मंजूर करण्यात आली आहेत.या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून जातीचे प्रमाणपत्र,उत्पन्नाचा दाखला, नमुना ८, घरटॅक्स आदी कागदपत्रांची अट घातली गेली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी संबंधित नगरपंचायत,नगर परिषद तथा तहसिल कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

