- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट यूजी-२०२६’ ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता शिक्षक पात्रता परीक्षेला अवघे काही तास शिल्लक उरलेले असतांनाच परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने उद्या,रविवार २८ जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा(TET) पेपरफुटीमुळे प्रशासनाने तडकाफडकी रद्द केली आहे.या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेचा पेपर लीक झाल्याचे उघडकीस आल्याने राज्यभरातील विद्यार्थी,शिक्षक आणि नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.प्राथमिक तपासानुसार,परीक्षेचा पेपर ठाणे जिल्ह्याच्या परिसरात फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून भिवंडी पोलिसांनी तपासासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून घेतले. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पडताळणी केली असता, संशयित व्यक्तींकडे सापडलेले प्रश्न आणि उद्या होणाऱ्या मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न तंतोतंत जुळत असल्याचे निष्पन्न झाले.याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे समजताच परीक्षा मंडळाने कोणतीही जोखीम न पत्करता तात्काळ परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.मात्र,हा पेपर नेमका कोणत्या टोळीने किंवा यंत्रणेमार्फत बाहेर काढला,याचा शोध सुरू आहे.
विशेष म्हणजे,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-टिईटी-२०२६ परीक्षा उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी दोन सत्रात होणार होती.शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक-१ रविवार,२८ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या वेळेत,
तर पेपर क्रमांक २ याच दिवशी दुपारी २.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत घेण्यात येणार होता.पण परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच परीक्षेचा खेळखंडोबा झाल्याने परीक्षार्थींनी अद्ययावत माहितीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळास नियमित भेट द्यावी,असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
- Advertisement -

