- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून येत्या,शनिवार ४ ऑक्टोंबर रोजी ५ हजार १८७ अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत.याचवेळी ५ हजार १२२ एमपीएससीद्वारे नियुक्तांनाही प्रमाणपत्र दिली जाणार असून,एकाच दिवशी १० हजार ३०९ उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होतील.अशाप्रकारचा हा इतिहासातील एक अनोखा कार्यक्रम ठरेल.शासकीय नोकरीत असतांना कर्मचार्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा अपत्याला नोकरी दिली जाते.पण,कधी तांत्रिक कारणाने तर कधी प्रशासकीय दिरंगाईने या नियुक्त्या रखडत होत्या.त्यामुळे त्यांना दीर्घ प्रतिक्षा करावी लागते. अशात या संवेदनशील विषयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले.त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला सूचना केल्या.सातत्याने प्रशासकीय बैठकांमध्ये त्याचा आढावा घेतला आणि नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आले.त्याचा परिणाम म्हणून अनुकंपा प्रतिक्षायादीतील ५ हजार १८७ अनुकंपा उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत.यामुळे अनुकंपाचा एक मोठा अनुशेष संपुष्टात येणार आहे.येत्या ४ ऑक्टोंबरला मुख्य कार्यक्रम हा मुंबईत होईल आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असतील,तर पालकमंत्री आपआपल्या जिल्ह्यात नियुक्तीपत्रे वितरित करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी १०० दिवस आणि नंतर १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या हाती घेतलेल्या कार्यक्रमातील हा महत्त्वाचा टप्पा होता. यासोबतच एमपीएससीतर्फे परीक्षा घेण्यात आलेल्या लिपीक-टायपिस्ट श्रेणीतील ५ हजार १२२ उमेदवारांना सुद्धा नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत.एकूण १० हजार ३०९ उमेदवारांपैकी सर्वाधिक ३ हजार ७८ उमेदवार हे कोकण विभागातील असून,२ हजार ५९७ हे विदर्भातील आहेत.पुणे विभागात १ हजार ६७४, नाशिक विभागात १ हजार २५०,तर मराठवाड्यातील १ हजार ७१० उमेदवार आहेत.
- Advertisement -

