उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- विशेष सत्र न्यायालयाने २५ हजार रुपयांची लाच घेणारे सहायक पोलिस उपनिरीक्षक हरिश्चंद्र रामराव बामनोटे वय ५९ वर्षे यांना चार वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दहा महिने अतिरिक्त कारावास तर, पोलिस वाहन चालक राजू शालिकराम आवजे वय ५५ वर्षे यांना तीन वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास,अशी शिक्षा सुनावली.न्यायाधीश राहुल भोसले यांनी हा निर्णय दिला.
घटनेच्या वेळी हे पोलिस कर्मचारी रामटेक येथे कार्यरत होते.फिर्यादी सीताराम रामटेकजवळच्या नदीतील रेतीची ट्रॅक्टर व ट्रॉलीने अवैध वाहतूक करीत होते.संबंधित रेती घाटाचा लिलाव झाला नव्हता. दरम्यान,रामटेक पोलिसांनी सीताराम यांच्याविरुद्ध रेती चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली.काही दिवसांनी बामनोटे यांनी सीतारामला बोलावून घेतले व अवैध रेती वाहतूक करायची असल्यास २५ हजार देण्याची मागणी केली.त्यामुळे सीतारामने नागपूरमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली.या विभागाने १५ एप्रिल २०१९ रोजी सापळा रचून बामनोटे यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.या गुन्ह्यात आवजेदेखील सामील होते.

