उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-शासनस्तरावरून नोकरदार वर्गांना जनतेची वा शासनाची कामे करण्यासंबंधाने सातव्या वेतन आयोगानुसार महिन्याकाठी मोठा पगार(वेतन) दिला जातो.तरीही काही जणांना अपुरेच असल्याचा प्रकार गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील चातगाव वनपरिक्षेत्रात उघडकीस आला आहे. करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कामांत गैरप्रकार केल्या प्रकरणी वन परिक्षेत्र अधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे.
गडचिरोली वनवृत्तातील गडचिरोली वनविभागा अंतर्गत धानोरा तालुक्यातील चातगाव वनपरिक्षेत्राचा समावेश होतो.मार्च २०२१ ते २०२४ पर्यंत करण्यात आलेली रोपवन लागवड,हेक्टरी मोजमाप,हेक्टरी लावण्यात आलेली झाडे आणि जगविलेली झाडे,प्रत्यक्ष लागवड न करता पैशाची उचल करणे असे अनेक आरोप ठेवत भारतीय जनसंसदचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी वनपरिक्षेत्राधिकारी पडवे यांच्याबाबत शासनाकडे तक्रार केली होती.प्रत्येक कामावर लावलेल्या मजुरांचे व्हाऊचर, मजुरांच्या सह्यांची खात्री करणे,मोजमाप पुस्तिका,प्रत्येक मजुराची प्रत्येक कामावरील बँक खाते पुस्तिका तपासून घेतल्यास या घोळ स्पष्टपणे दिसणार असल्याचे त्यांनी वनमंत्री,वन सचिवांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते.याशिवाय साहित्य खरेदीमधील कोटेशन, जीएसटीची बिले तपासण्याची मागणी केली होती.वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या निर्देशावरून वनरक्षक,वनपालांनी अनेक कामांवर अनेक बोगस मजूर दाखवून शासकीय निधी हडप केला असल्याची चर्चा होती. याशिवाय चातगाव वनपरिक्षेत्रात अतिक्रमण,अवैध उत्खनन,वृक्षतोडही झाल्याचा संशय होता.दरम्यान आरएफओने वनपालामार्फत आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी,अशीही मागणीही खरवडे यांनी केली होती.दरम्यान मुख्य वनसंरक्षक एस.रमेशकुमार यांनी या तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली.चौकशी अंती वन परिक्षेत्र अधिकारी एस.बी.पडवे हे दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

