उद्रेक न्युज वृत्त
लाखांदूर(भंडारा):-मोकडळीस आलेले घर आणि स्लॅबचे छत व्हायब्रेटर मशीनने पाडण्याचे काम सुरू असतानाच छत अंगावर कोसळून २५ वर्षीय मजुराचा दबून मृत्यू झाल्याची घटना काल,२५ जुलैच्या दुपारी लाखांदूर तालुक्यातील सोनी गावात घडली.प्रफुल प्यारेलाल रामटेके वय २५ वर्षे, रा.हेटी,देसाईगंज (वडसा),जि.गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे. अवघ्या २५ वर्षीय युवकाचा घराचे स्लॅब पाडत असताना भिंत अंगावर पडून मृत्यू झाल्याची घटना सोनी येथे पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.
सोनी येथील प्रियकांता गोपीचंद बावणे यांचे घर जीर्ण झाल्याने पावसाळ्यात केव्हाही कोसळण्याची शक्यता होती.त्यामुळे त्यांनी ते पाडण्यासाठी मजुरांना काम दिले होते.यासाठी व्हायब्रेटर मशीनच्या साहाय्याने घर पाडण्यासाठी देसाईगंज(वडसा)-हेटी येथील प्रफुल प्यारेलाल रामटेके याला पाचारण केले होते.हाताला मिळेल ती मजुरी करून प्रपंच चालविणाऱ्या प्रफुल्लला हे काम मिळाल्याने त्याने एका व्यावसायिकाकडून विजेवर चालणारी घर पाडण्याची व्हायब्रेटर मशीन भाड्याने आणली होती.सोबत मदतनीस म्हणून एकाला कामावर घेतले होते.
सकाळपासून काम सुरू होते.दरम्यान,व्हायब्रेटर मशीनने घराचे स्लॅब पाडत असताना मदतनीस युवक काही कामानिमित्त बाहेर गेला.काम लवकर संपावे यासाठी प्रफुल्लने व्हायब्रेटर मशीनच्या सहाय्याने घराचे छत पाडण्याचे काम सुरू ठेवले.मात्र,घर जीर्ण झाले असल्याने घराची स्लॅब व भिंत अंगावर पडून प्रफुलचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती कळताच लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार गोपाल कोसरे,नायक संदिप बावनकुळे,अंमलदार राहुल कोटांगले यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.मृतदेह शवविच्छेदनासाठी कुटुंबीयांच्या स्वाधीन केला.या घटनेची माहिती स्थानिक सोनी येथील तलाठी आशिष खामनकर,ग्रामसेवक विलास मुंढे, कोतवाल मंगेश सुखदेवे व सरपंचा कुंता शहारे यासह अन्य ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला.

