उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिरिक्त कार्यभार असलेले डॉ.अंबर श्रीराम मडावी वय ४४ वर्षे यांनी ४८ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याप्रकरणी त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.सदरची कारवाई काल,दिनांक – २४ जून रोजी करण्यात आली.
यातील तक्रारदार हे प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथे कनिष्ठ सहायक म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या वेतन निश्चिती,नक्षलभत्ता/प्रोत्साहन भत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता थकबाकीच्या फरकाचे ६,०७,३२० रुपयांचे बील स्वाक्षरी करून जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद गोंदिया यांच्या कार्यालयात पाठविण्याकरिता बिलाच्या रकमेवर १० टक्केप्रमाणे ६० हजार रुपयांची लाच मागणी करीत असल्याबाबतची तक्रार ११ जून रोजी लाच लुचपत प्रतिबंधक प्राप्त झाली होती.१२ जून रोजी पथकाने पडताळणी केली.
लाच मागणी पडताळणीदरम्यान आरोपीने तक्रारदाराच्या बिलाच्या ६,०७,३२० रुपये रकमेवर पंचासमक्ष आठ टक्केप्रमाणे ४८ हजार रुपये इतक्या लाचेची मागणी केली व लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली.यावरून डॉ.मडावी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.त्यानुसार अर्जुनी मोरगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

