उद्रेक न्युज वृत्त :- रेती चोरीचे चित्रीकरण केल्याच्या संशयावरून रत्नागिरीतील रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता धनराज गेडाम वय ४९ वर्षे यांच्यावर फावड्याने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी रत्नागिरी शहरातील पांढरा समुद्र येथे घडला.हा हल्ला करणाऱ्या दोघांना गेडाम यांनीच चोप दिला असून,दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षलता गेडाम शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मुरूगवाडा-पांढरा समुद्र किनाऱ्यावर ‘मॉर्निंग वॉक’ साठी गेल्या होत्या.किनाऱ्यावरून त्या समुद्राचे चित्रीकरण करत होत्या.याचवेळी पांढरा समुद्र येथे दोन सफेद रंगाच्या गाड्या वाळू भरून जात होत्या, तर एक लाल रंगाचा ट्रक मिरकर वाड्याच्या दिशेने उभा होता.त्यामध्ये काही व्यक्ती वाळू भरत होत्या.
चित्रीकरण करत असताना वाळू भरणाऱ्या गाडीतील एक जण त्यांच्या दिशेने आला.त्याने ‘तुम्ही आमच्या गाड्याचे फोटो का काढताय?’ असे विचारले.त्यावर ‘मी समुद्राचे चित्रीकरण करतेय’ असे सांगून त्या रेस्ट हाउसच्या दिशेने चालत निघाल्या.त्याचवेळी तिसरी सफेद रंगाची बोलेरो पिकअप गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली.त्या गाडीतून दोघे खाली उतरले आणि त्यांनी ‘तुमचा मोबाइल माझ्याजवळ द्या’ असे सांगत मोबाइल हिसकावून घेऊ लागले.त्याचवेळी त्या थोडे मागे आल्या आणि त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर कराटे किक मारली.त्यामुळे तो खाली पडला.हे बघून त्याच्यासोबत असलेली अन्य व्यक्ती गाडीतील फावडे घेऊन त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावत आली.त्या थोड्या बाजूला झाल्याने तो तसाच पुढे गेला आणि त्यांनी त्याच्या पाठीमागून किक मारली.त्यानंतर किनाऱ्यावरील इतर व्यक्ती मदतीसाठी धावल्या. वातावरण निवळताच गेडाम तिथून निघून आल्या.
हर्षलता धनराज गेडाम,उपजिल्हाधिकारी (रोहयो), रत्नागिरी👇
मी मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतल्याने मला स्वतःचा बचाव करता आला.प्रत्येकाला स्वतःचा बचाव करता आला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने बचावाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. विशेषतः महिलांना हे प्रशिक्षण गरजेचे आहे.

