उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- पदवीचे शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय विद्यार्थिनीवर कॉलेजला जाताना वाटेत दोघांनी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना सहा वर्षापूर्वी कुरखेडा तालुक्यात घडली होती.या प्रकरणात काल, १७ मे २०२४ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावास व पावणेतीन लाख रुपयांचा दंड,अशी शिक्षा सुनावली.
प्रशांत उत्तम जोगे वय ३२ वर्षे व रवींद्र सुमराज मडावी वय २५ वर्षे दोघेही रा.बेलगाव,ता. कुरखेडा, अशी आरोपींची नावे आहेत.पीडित २३ वर्षीय मुलगी सायकलवरून गावातून कुरखेडा येथे कॉलेजमध्ये शिकण्यासाठी जायची.३ मार्च २०१८ रोजी ती नित्याप्रमाणे सायकलवरून जात होती.वाटेत प्रशांत जोगे व रवींद्र मडावी यांनी दुचाकीवरून येऊन सायकलला धडक दिली.ती खाली कोसळताच दोघांनी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले व बेलगाव ते मालदुगी या जंगल भागात कच्च्या रस्त्याने घेऊन गेले. रस्त्यापासून ५० मीटर अंतरावर जंगल परिसरात दुपारी १२ ते १२:३० वाजेदरम्यान तिच्यावर अतिप्रसंग केला.पीडितेने तीव्र विरोध केला तेव्हा रवींद्र मडावीने तिचे हातपाय पकडले व प्रशांत जोगे याने टोकदार वस्तूने तिला जखमी केले.नंतर तिच्याशी कुकर्म केले.७ मार्च २०१८ रोजी कुरखेडा ठाण्यात बलात्कार,विनयभंग,मारहाण आदी कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक गजानन पडळकर व उपनिरीक्षक विजय वनकर यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.विशेष जिल्हा व सत्र न्या.उत्तम एम. मुधोळकर यांनी साक्षीपुरावे व जिल्हा सरकारी वकील अनिल एस.प्रधान यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून दोन्ही आरोपींना दोषी ठरवले.प्रत्येकी दहा वर्षे सक्तमजुरी व २ लाख ७४ रुपयांचा दंड ठोठावला.दंडाची रक्कम पीडितेला देण्याचे आदेशात नमूद आहे.

