उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- शासन स्तरावरून कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बाबत परिपत्रक काढूनही कित्तेक कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याने आम जनता व गोर-गरीब नागरिकांची कामे खोळंबली जाऊन अनेकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते.अशातच पहिल्यांदाच गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी नुकतेच सर्व विभाग प्रमुखांच्या नावे पत्र काढून जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयातच राहावे,जे कर्मचारी मुख्यालयात राहणार नाहीत,त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश दिले आहेत.त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
ग्रामस्तर,तालुका आणि जिल्हास्तरावरील सर्व विभागातील वर्ग १ ते वर्ग ४ पर्यंतच्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहणे आवश्यक आहे.कार्यालय प्रमुखांनी वेळोवेळी आपल्या अधिनस्त कर्मचारी मुख्यालयात राहतात की नाही,याची माहिती घ्यावी.त्याचबरोबर सर्व कार्यालय प्रमुख,गटविकास अधिकारी,विभाग प्रमुख,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य आहे.जे कर्मचारी सरकारी निवासस्थानात राहतात; अशा कर्मचाऱ्यांना संबंधित कार्यालय प्रमुखास प्रमाणित करणे, जे कर्मचारी निवासस्थानात राहत नाही,अशा कर्मचाऱ्यांच्या भाडे कराराची कागदपत्रे मागणे,संबंधित कर्मचाऱ्यांवर कार्यालय प्रमुख नियमानुसार प्रशासकीय कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे; असे पत्रात म्हटले आहे.सीईओंच्या या पत्रामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

