- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जंगली हत्तींचा कळप ऐन निसाव्यावर आलेल्या धानपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. अश्यातच गेल्या तीन दिवसांपासून जंगली हत्तींचा कळप पोर्ला वनपरिक्षेत्रातील चुरचुरा बिटात ठाण मांडून बसल्याने परिसरातील शेतकरी बांधवांची धाकधूक वाढली आहे.विशेष म्हणजे,कळपात एक- दोन नव्हे,तर तब्बल ३३ हत्तींचा समावेश आहे.त्यातच,चुरचुरा बिटातील चुरचुरा,कुऱ्हाडी,महादवाडी परिसरातील शेतांमध्ये हत्तींचा वावर वाढला आहे.कळपातील हत्ती धानपिके तुडवत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.यंदाच्या खरीप हंगामात हत्तींकडून पिकांचे नुकसान होण्याची ही तिसरी वेळ असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.दरम्यान,रात्रीच्या सुमारास हत्तींचा कळप महादवाडी गावाजवळील ठाकरे फार्म हाऊसजवळ पोहोचल्याने एकच खळबळ उडाली.कळपावर वनविभागाकडून बारकाईने नजर ठेवली जात असली तरी हत्तींच्या सततच्या वावरामुळे शेतकऱ्यांना धडकी भरली आहे.काहींनी उसनवारी व बँकांतून कर्ज काढून शेती पिकवण्याचा धाडस केला आहे; मात्र,जंगली हत्ती या धाडसावर पूर्णपणे पाणी फेरत असल्याचे चित्र आहे. प्रसंगी वनविभागाने हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांना पिकांच्या क्षेत्रापासून दूर हुसकावून लावावे,अशी मागणी परिसरातील शेतकरी बांधवांनी केली आहे.
- Advertisement -

