- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा हा जंगलयुक्त, आदिवासी व दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे मलेरिया आजारासाठी संवेदनशील(एन्डेमिक)क्षेत्र म्हणून ओळखला जातो.विशेषतः पावसाळ्यानंतर डासांची वाढ वेगाने होत असल्याने मलेरियाचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत नियमित सर्वेक्षण, रक्त तपासणी,औषधोपचार व कीटकनाशक फवारणीसारख्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून,चालू वर्षात मलेरिया नियंत्रणात सकारात्मक घट दिसून येत आहे.तथापि, दुर्गम भागातील जागरूकतेचा अभाव व भौगोलिक अडचणी लक्षात घेता सातत्याने दक्षता बाळगणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
जिल्हाधिकारी अविश्यंत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक मलेरिया दिनानिमित्त जिल्हा परिषद, गडचिरोली येथे व्यापक जनजागृती व आढावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. माधुरी किलनाके,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमरेश तिवारी,सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. छाया उईके तसेच जिल्हा व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल(VBDC) सल्लागार राजेश कार्लेकर,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.सुजाता वाढीवे यांच्यासह संबंधित अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
- “Test,Treat,Track” धोरणावर भर👇
मार्गदर्शन करताना सीईओ सुहास गाडे म्हणाले, “प्री-मान्सून कालावधीत प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे राबविणे अत्यंत गरजेचे आहे.मलेरिया नियंत्रणासाठी ‘Test,Treat,Track’ या धोरणानुसार प्रत्येक संशयित रुग्णाची त्वरित तपासणी व उपचार सुनिश्चित करणे आवश्यक आहे.” ग्रामीण व दुर्गम भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका मलेरिया निर्मूलनात अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
- प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर👇
मलेरिया प्रतिबंधासाठी घराच्या परिसरात पाणी साचू न देणे,नियमित कीटकनाशक व धूर फवारणी करणे, कीटकनाशकयुक्त मच्छरदाणी(LLIN)चा वापर करणे, ताप आल्यास त्वरित रक्त तपासणी करून योग्य उपचार घेणे तसेच अंगावर पूर्ण कपडे परिधान करून डासांपासून संरक्षण करणे या उपाययोजनांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी सहकार्य करून सर्वेक्षणात सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन करण्यात आले.
- जनजागृती रॅली व कर्मचाऱ्यांचा गौरव👇
कार्यक्रमादरम्यान मलेरिया नियंत्रणात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.तसेच नर्सिंग विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत काढलेल्या जनजागृती रॅलीमुळे परिसर जागरूकतेने दुमदुमून गेला. “मलेरिया टाळा – जीवन वाचवा”, “स्वच्छ परिसर, निरोगी जीवन” अशा संदेशांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमाच्या माध्यमातून मलेरिया प्रतिबंध,नियंत्रण व निर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आली. “मलेरिया मुक्त गडचिरोली” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग राहून प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन यावेळी करण्यात आले.
- Advertisement -

