- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा अधिक झटका मिळणार आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने फास्टॅग वार्षिक पासच्या किंमतीत अडीच टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.सदरची वाढ ही पुढील एप्रिल महिन्याच्या १ तारखेपासून लागू करण्यात येणार आहे.त्यामुळे,३ हजार रुपयांत मिळणारा हा पास आता ३ हजार ७५ रुपयांना मिळणार आहे.या पासच्या माध्यमातून वाहनधारकांना देशातील निवडक टोल प्लाझांवर थांबण्याची गरज न पडता सहज प्रवास करता येतो.विशेष म्हणजे,फास्टॅग वार्षिक पास सुरू करतांनाच त्याच्या अधिसूचनेत दरवर्षी किमतींचे पुनरावलोकन करण्याची तरतूद करण्यात आली होती.त्यानुसारच यंदा वार्षिक पुनरावलोकन करताना अडीच टक्के वाढ करण्यात आली आहे.देशभरातील महामार्गावरील टोल दरांमध्ये बदल करण्यासाठी जे निश्चित सूत्र वापरले जाते,त्याच आधारावर ही वाढ करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारने हा विशेष वार्षिक पास १५ ऑगस्टपासून सुरू केला होता आणि त्याला वाहनचालकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.आतापर्यंत देशभरातील ५२ लाखांहून अधिक वाहनधारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी हा पास अत्यंत किफायतशीर मानला जातो.या पासचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे,तो एका वर्षात कितीही वेळा रिचार्ज करता येतो,त्यामुळे वारंवार प्रवास करणाऱ्या चालकांना मोठा फायदा होतो.दरम्यान, वाहनधारकांना जुन्या दरात पास घेण्याची संधी अद्याप उपलब्ध आहे.जे वापरकर्ते ३१ मार्चपर्यंत आपला पास रिचार्ज करतील किंवा नवीन पास खरेदी करतील,त्यांना तो ३ हजार रुपयांच्या जुन्या दरातच मिळेल.मात्र १ एप्रिलच्या सकाळपासून सिस्टममध्ये नवीन दर लागू केले जाणार असून त्यानंतर पाससाठी ३०७५ रुपये मोजावे लागतील.सध्या हा वार्षिक पास देशातील प्रमुख २०० टोल प्लाझांवर वैध आहे.त्यामुळे प्रवाशांना टोल नाक्यांवर थांबण्याची गरज राहत नाही आणि वेळेची बचत होते.तसेच वारंवार टोल टॅक्स कापण्याच्या त्रासातूनही वाहनधारकांना दिलासा मिळतो.
- Advertisement -

