- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-बेपत्ता झालेल्या २३ वर्षीय मुलाचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.अश्यातच आई ही सरपण गोळा करण्यासाठी जंगल परिसरात गेली असता तिला एका ठिकाणी मानवी सांगाडा आढळून आला.सदरचा सांगाडा आपल्या बेपत्ता मुलाचा असावा,असा संशय तिने व्यक्त केला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत जागेचा पंचनामा करुन अवशेष बाहेर काढले. मृतदेहाची ओळख पटवणे कठीण असल्याने त्याचे अवशेष डीएनए चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले.लागलीच जंगलात सापडलेल्या सांगाड्याचा दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवार २८ फेब्रुवारी २०२६ रोजी डीएनए अहवाल आला आणि अहवालातून तब्बल अडीच वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या खुनाचा उलगडा झाला.सदरची घटना ही गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात उघडकीस आली असून प्रकरणी आज,सोमवार २ मार्च रोजी कोरची पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.विशेष म्हणजे,मारेकरी दुसरा कुणी नसून मुलाचा मोठा काका व एकजण काकाचा सहकारी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.महेश श्यामसाय कळ्यामी वय २३ वर्षे,रा.आंबेखारी,ता.कोरची, जि.गडचिरोली असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.तर रामदास अमरू कळ्यामी वय ५९ वर्षे रा. आंबेखारी व दसरू ठाकूरराम कल्लो वय ४२ वर्षे रा. बोंडे,ता.कोरची अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
प्रकरणातील मृतक महेशचे वडील श्यामसाय आणि मोठे काका रामदास यांच्यात जमिनीच्या हिश्श्यावरून वाद होता.जुलै २०२४ मध्येदेखील जमिनीच्या वादातून रामदास आणि महेशचे भांडण झाले होते. वादाच्या दिवशी रामदास आणि त्याचा साथीदार दसरू कल्लो यांनी महेशचा पाठलाग करून त्याला जंगलात नेत खून केला.त्यानंतर,त्याचा मृतदेह जमिनीत गाडून टाकला. इकडे महेशच्या घरच्यांनी त्याची बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार नोंदवली होती.दरम्यान, नोव्हेंबर २०२४ मध्ये महेशची आई दुमलाबाई जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेली असता तिला मानवी सांगाडा आढळून आला.सदरचा सांगाडा आपल्या बेपत्ता मुलाचा असावा, असा संशय तिने व्यक्त केला.मृतदेहाची ओळख पटवणे कठीण असल्याने त्याचे अवशेष डीएनए चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.त्यानंतर सांगाडा महेशचाच असल्याचे निष्पन्न झाले.प्रकरणी आरोपींना आज सोमवारी अटक करण्यात आली.कोरची पोलीस ठाण्याचे ठाणेदार शैलेंद्र ठाकरे,एपिआय मुकुंद देशमुख, दलपत मडावी,पोलिस हवालदार लक्ष्मण नैताम, हस्तकला दर्रो,इन्साराम ताराम,धोंडणे यांनी गुन्ह्याचा तपास करून गुन्ह्याची उकल केली.तर प्रकरणाचा पुढील तपास एपीआय मुकुंद देशमुख करीत आहेत.
- Advertisement -

