- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-मनातील राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू समजला जातो.एखाद्याने ज्याचा कुणाचा राग धरून ठेवला,तर तो शांत होईपर्यंत चूप बसत नाही.असाच काहीसा प्रकार गडचिरोली तालुक्यात उघडकीस आला आहे.जिवाच्या आकांताने ‘ती’ ओरडत राहिली अन् ‘तो’ कुऱ्हाडीने वार करत राहिला.आवाजानंतर परिसरातील शेतकरी सतर्क झाले,पण धान उंच वाढलेले असल्याने ती कोणत्या बांधीत आहे; ते कळलेच नसल्याने अखेर शेतात रक्तबंबाळ स्थितीत महिलेचा मृतदेह आढळून आला.ललिता देवराव गेडेकर वय ५५ वर्षे,रा.पूलखल ता.जि.गडचिरोली असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.सदरची चित्तथरारक घटना काल,सोमवारी २२ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास गडचिरोली तालुक्याच्या पुलखल गाव नजिकच्या शेतशिवारात घडली.
सन २०२२ मध्ये २८ वर्षीय कैलास रामकृष्ण मेश्राम रा.पूलखल ता.जि.गडचिरोली याचा ललिता आणि तिचा २१ वर्षीय मुलगा नरेश देवराव गेडेकर या दोघांनी मिळून फावड्याने वार करून ठार केले होते.हत्येप्रकरणी मायलेक ललिता गेडेकर व नरेश गेडेकर या दोघांना अटक झाली होती.त्यानुसार दोन्ही आरोपींची चंद्रपूर येथील कारागृहात रवानगी करण्यात आली होती.यातील आरोपी नरेश गेडेकर अद्यापही कारागृहात शिक्षा भोगत आहे.तर ललिता गेडेकर हिला दोन वर्षापूर्वी जामीन मिळाल्याने ती गावी परतली होती व सुन ज्योत्स्ना(नरेश गेडेकर याची पत्नी)सोबत ती पूर्ववत सुरळीत जीवन जगत होती.अश्यातच काल सोमवारी ललिता ही सकाळच्या सुमारास स्वतःच्या शेतात निंदणासाठी गेली होती.निंदणी करत असतांनाच अज्ञात इसमाने तिच्यावर कुऱ्हाडीने वार करण्यास सुरुवात केली.जिवाच्या आकांताने ती ओरडत पळत सुटली.पण,धावतांना धानाच्या बांधीत कोसळली.यात अज्ञाताने वार करून जिवानिशी ठार केले होते.परिसरातील शेतकरी धावून गेले असता,मृतदेह सापडण्यास तब्बल दोन तास लागले होते.धान उंच वाढलेले असल्याने ती कोणत्या बांधीत आहे; ते कळलेच नाही.शेवटी एका बांधीत ललिताचा मृतदेह आढळून आला.घटनेची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला.प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ६० वर्षीय रामकृष्ण मेश्राम यास ताब्यात घेतले आहे.विशेष म्हणजे,कैलास रामकृष्ण मेश्राम याचा तीन वर्षापूर्वी ललिता आणि तिचा मुलगा नरेश गेडेकर या दोघांनी मिळून फावड्याने वार करून ठार केले होते.त्याचाच राग मनात धरून रामकृष्ण मेश्राम याने ललिताचा खून केला असावा,अशी शंका पोलिसांना असल्याने त्याला ताब्यात घेतले आहे.
- Advertisement -

