उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- शहराजवळील जुनोना जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेलेल्या स्कूल बस चालकावर वाघाने हल्ला केला.यात बस चालकाचा मृत्यू झाला. सदरची घटना काल सोमवारी २१ नोव्हेंबरला सकाळी घडली.मनोहर वाणी वय ५२ वर्षे असे मृताचे नाव आहे.मनोहर हा शहरातील दादावाडी विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये स्कूल बसचालक म्हणून कार्यरत आहे. मनोहर हा बायपास जुनोना रोड येथील संत तुकाराम चौक,आंबेडकरनगर येथील रहिवासी आहे.वाघाच्या हल्ल्यातील हा या वर्षांतील २१ वा बळी आहे.
शहरातील दादावाडी येथील विद्यानिकेतन हायस्कूलमधील स्कूल बस चालक मनोहर वाणी हे सोमवारी सकाळी जुनोना जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी गेले होते.दरम्यान,भक्ष्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वाघाने मनोहरवर हल्ला केला.ज्यामध्ये मनोहरचा मृत्यू झाला.मनोहर गेल्या १५ वर्षांपासून बसचालक म्हणून काम करत होते.शनी मंदिर परिसरापासून सुमारे ३०० ते ४०० मीटर अंतरावर मनोहर यांचा मृतदेह आढळून आला.याबाबतची माहिती आपचे राजू कुडे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत वनविभागाला माहिती दिली.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला.कुडे व परिसतील इतर नागरिकांनी मृताच्या कुटुंबीयांना २५ लाखांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली.चर्चेनंतर वनविभागाने तपास पूर्ण करून आर्थिक मदतीचे आश्वासन दिले.

