- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोली ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३५३ सी वरील साखरा गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेसमोर तात्काळ स्पीड ब्रेकर,चेतावणी फलक आणि झेब्रा क्रॉसिंग बसवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत,अशी मागणी साखरा येथील रहिवासी दिनेश बोरकुटे यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षांकडे केली आहे.
बोरकुटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,साखरा गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ही राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या २० फूट अंतरावर आहे.शेकडो विद्यार्थी दररोज हा महामार्ग ओलांडून शाळेत ये-जा करतात.या मार्गावरील वाहने सुसाट वेगाने पळविली जातात.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला सतत धोका निर्माण होऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता कायम आहे.या विषयावर यापूर्वीही अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला आहे.सन २०१९ मध्ये तत्कालीन उपसरपंच अर्चनाताई चुधरी(बोरकुटे) यांनी हा प्रश्न राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग,नवी दिल्ली तसेच गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त जनसुनावणीत मांडला होता.हा विषय राज्य बाल अधिकार संरक्षण आयोग,मुंबई यांच्याही निदर्शनास आणून देण्यात आला होता.ग्रामपंचायत साखरा यांनी विशेष ग्रामसभेत शाळेसमोर स्पीड ब्रेकर बसविण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करून जिल्हा प्रशासनास पाठवला होता. तरीदेखील आजतागायत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे बोरकुटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.त्यांनी सांगितले की,गडचिरोली शहरातील नामांकित व खाजगी शाळांसमोर सर्व सुरक्षा साधने उपलब्ध आहेत.परंतु,साखरा शाळेसमोर जिथे शेतकरी व मजूर कुटुंबातील मुले शिकतात,तिथे अजूनही कोणतीही सुविधा नाही.हे अत्यंत अन्यायकारक व भेदभावपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मानक दर्जाचे स्पीड ब्रेकर,चेतावणी फलक,झेब्रा क्रॉसिंग व इतर आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात,अशी मागणी बोरकुटे यांनी केली आहे.त्यामुळे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- Advertisement -

