उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यातील काही भागात दोन दिवसांपूर्वी वादळी वारे तसेच विजांच्या कडकडाटसह पावसाने हजेरी लावली होती.या वादळी पावसामुळे चामोर्शी तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली होती.तर वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यूही ओढावला.मान्सूनपूर्व पावसाची ही झलक असल्याचे जिल्हावासीयांनी अनुभवले.मात्र दोन दिवसानंतर पुन्हा वातावरणात बदल होऊन पुन्हा उकाडा वाढला.यामुळे गरमीने नागरिकांची लाहीलाही झाली.अशातच हवामान विभागाने विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यात ठिकठिकाणी ९ जून ते १२ जुनपर्यंत विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारा सुटण्याची शक्यता वर्तविली आहे.हवामान विभागाच्या या शक्यतेमुळे जिल्हावासीयांची पुन्हा तारांबळ उडाली आहे.तर शेतकऱ्यांना मात्र मान्सूनची चाहूल लागल्याने आनंद व्यक्त केला आहे.पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पुन्हा एकदा शेतीच्या कामात व्यस्त होण्याची चिन्हे आहेत.

