उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- जिल्ह्याच्या अनेक शहरी भागाबरोबरच तालुक्याच्या ग्रामीण भागातील कित्तेक पेट्रोल पंपांवर मोफत हवा भरण्याचा थांगपत्ताच लागेनासा झाला आहे.हवा भरण्यासाठी मोफत सेवा असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात त्याचा उलटाच अनुभव वाहनचालकांना येत आहे.देसाईगंज तालुक्यासह आरमोरी,कुरखेडा,कोरची तालुक्यात पेट्रोल पंपांवर मोफत हवा भरण्याची यंत्रणा बंद अवस्थेत आढळून येत असल्याने पुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.अशातच एकंदरित पेट्रोल पंपचालक एकीकडे इंधन विक्रीतून अव्वाच्या- सव्वा नफा मिळवत असतांना सुविधांबाबत मात्र चालढकल करतांना दिसत असल्याच्या तक्रारी वाहनचालकांकडून केल्या जात आहेत.
काही पंपावर हवा भरण्यासाठी खासगी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.तिथे पंक्चर काढण्याची सोय असून,त्यांच्याकडून हवा भरण्यासाठी विशिष्ट रक्कम अदा करावी लागत असते.याबाबत विचारणा केल्यास पंपचालक संबंधित सेवा मोफत असल्याचे पैसे दिल्यानंतर सांगतात.त्यामुळे अप्रत्यक्षरित्या वाहनचालकांची मोठी गैरसोय होत असल्याने संबंधित विभागाने अशा पेट्रोल पंपचालकांवर कारवाई करण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.काही पेट्रोल पंपाच्या बाजूलाच अगदी खासगी दुकाने थाटली आहेत.कधी-कधी त्यांच्याकडेही हवा भरावी लागत आहे.
देसाईगंज तालुक्यासह आरमोरी,कुरखेडा,कोरची तालुक्यातील बहुतांशी पेट्रोल पंपावर ही असुविधा पाहायवास मिळत असल्याने वाहनचालकांत संताप आहे.पेट्रोल भरले नाही तरी देखील या सुविधेचा लाभ घेऊ शकता.यासाठी पेट्रोल पंपचालकांकडून पैसे आकारले जात नाहीत.काही ठिकाणी हवा भरण्याची यंत्रे बसविण्यात आली आहेत.मात्र सदर यंत्र खराब असल्याचे सांगण्यात येत असते.यामुळे गाडी पंक्चर झाल्यास ढकलत न्यावी लागते.कधी कधी हवाही व्यवस्थित भरली जात नाही.अशाप्रकारे वाहनचालकांना त्रास देणाऱ्या पेट्रोल पंपचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.याबाबत पुरवठा विभागाकडूनही डोळेझाक होत असल्याचे वाहनचालक सांगत आहेत.
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे नसले तरी मात्र मोफत सुविधेचा लाभ वाहनचालकाला घेता येऊ शकतो. संबंधित पेट्रोल पंपावर या सुविधा नसतील किंवा मोफत देण्यास नकार देण्यात आला तर संबंधित पेट्रोल पंप मालकाविरोधात तक्रार दाखल करू शकता.या सुविधा मोफत देण्यात येत नसल्याचे आढळल्यास संबंधित पेट्रोल पंप चालकावर मार्केटिंग डिसिप्लिन गाइडलाइनचे उल्लंघ केल्याप्रकरणात करावाई होऊ शकते.

