उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-झटपास पैसा व पटकन श्रीमंतीच्या नादात अनेकजण शॉर्टकट मार्गाचा अवलंब करतांना दिसून येतात.आजची तरुणाई याकडे सर्वात जास्त वळलेली सर्वत्र आढळून येऊ लागली आहे.असाच प्रकार नागपुरात तीन दिवसांपूर्वी घडला.एका १७ वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याच्या पालकांकडे दोन लाख रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,शॉर्टकट कमाईसाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते.या पैशांतून पिस्तूल खरेदी करण्याचादेखील त्यांचा विचार होता. यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली होती.दीप आनंद गुरव वय १७ वर्षे पंचवटीनगर,असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे.तो अकराव्या वर्गात शिकतो.शुक्रवारी आरोपींना भेटण्यासाठी एनआयटी गार्डन परिसरात गेला. आरोपींनी शिवीगाळ करीत त्याला बळजबरीने दुचाकीवर बसविले आणि यशोधरानगर परिसरातील एका घरी घेऊन गेले.तेथे त्याला त्यांनी चाकूचा धाक दाखविला.दीपचा मोबाइल घरीच होता.रात्री साडेनऊ वाजता एका आरोपीने दीपच्या मोबाइलवर फोन केला व ‘तुमच्या मुलाचे अपहरण झाले आहे.मुलगा सुखरूप पाहिजे असल्यास दोन लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल.कोणालाही सांगितल्यास तुमच्या मुलास ठार करेल’ अशी धमकी दिली.हे ऐकून त्याची आई कविता या घाबरल्या व त्यांनी पतीला कळविले. त्यांनी थेट यशोधरानगर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी दीपचा मोबाइल तपासला असता त्यावर ९७३०३९२७९५ या क्रमांकावरून फोन आल्याचे दिसून आले.पोलिसांनी तो मोबाइल ट्रेस केला.त्याच्या लोकेशनवरून पोलिसांनी आरोपींचे स्थळ गाठले व त्यांना अटक केली.आरोपींनी पोलिस येत असल्याचे पाहताच दीपला सोडले.दीप सुखरूप होता. पोलिसांनी त्याला पालकांच्या हवाली केले.आकाश लोणारे वय २२ वर्षे रा.इंदिरामातानगर,विनीत ऊर्फ प्रणय खोब्रागडे वय २० वर्षे रा.एनआयटी गार्डन धम्मदीपनगर,गौरव मिश्रा वय २९ वर्षे रा.पिवळी नदी आणि विक्की दिघोरीकर २४, रा.वनदेवी झोपडपट्टी, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.चारही आरोपी मित्र आहेत.त्यापैकी प्रणय हा शिक्षण घेत आहे.ते नेहमीच एनआयटी गार्डनमध्ये बसतात.१५ दिवसांपूर्वी सायंकाळी गार्डनमध्ये बसले असताना कमी वेळात अधिक पैसा कमविण्यासाठी त्यांनी अपहरण करण्याचा कट रचला.त्यांनी परिसरातच एक खोली भाड्याने घेतली.दीप प्रणयच्या घराजवळच राहतो व त्याच्याविषयी त्यांना कल्पना होती.आरोपींनी त्याला फोन करून त्याच्याशी अकारण वाद घालत त्याला बोलण्यासाठी बोलविले होते. अपहरणाच्या पैशांतून पिस्तूल किंवा एखादे शस्त्र विकत घेण्याचा विचार आरोपी करीत असल्याची माहिती अटकेतील एका आरोपीने पोलिसांना दिली.

