- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यातील भामरागड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर,छत्तीसगड सीमेवर वसलेल्या बिनागुंडा या गावात नुकताच एक प्रेरणादायी क्षण साकारण्यात आला.दीर्घकाळ नक्षलवाद्यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दुर्गम भागात,विनोबा आश्रम शाळा बिनागुंडा येथील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी आदित्य पोदाडी याने सुरेल आवाजात महाराष्ट्र राज्यगीत सादर करत उपस्थितांच्या मनात आशा,आत्मविश्वास आणि अभिमानाचा दीप प्रज्वलित केला.३१ जानेवारी रोजी बिनागुंडा येथे आयोजित जनजागरण मेळाव्यात राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत हे स्फूर्तीदायक सादरीकरण झाले. नुकतेच २४ जानेवारी रोजी अवघ्या २४ तासांत उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्रामुळे या भागात सुरक्षिततेची नवी पहाट उजडली आहे. महासंचालक दाते यांनी येथे प्रत्यक्ष भेट देत स्थानिक पोलीस दलाचे मनोबल वाढवले आणि नागरिकांशी संवाद साधला.या पार्श्वभूमीवर आदित्यच्या स्वरातून उमटलेले महाराष्ट्र राज्यगीत केवळ सांस्कृतिक सादरीकरण नव्हे; तर बदलाचे प्रतीक होते.जिथे कधीकाळी भीतीचे सावट होते,तिथे आज संविधान, लोकशाही आणि शांततेचा आवाज घुमू लागला आहे लहानशा विद्यार्थ्याच्या गाण्याने संपूर्ण परिसर भारावून गेला आणि टाळ्यांच्या कडकडाटात विश्वासाचा नवा अध्याय लिहिला गेला. अनेक दशकांपासून नक्षल्यांनी वेढल्या गेलेल्या या भागात,शिक्षण,सुरक्षा आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती एकत्र येऊन विकासाचा मार्ग प्रशस्त होत असल्याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे.बिनागुंडात निनादलेले महाराष्ट्र राज्यगीत म्हणजे भीतीवर मात करत पुढे जाण्याचा निर्धार,आणि शांततेच्या दिशेने चाललेले आत्मविश्वासपूर्ण पाऊल आहे.
- Advertisement -

