- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या आलापल्ली वन परिक्षेत्र प्रादेशिक कार्यालयाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल आणि वनरक्षकास ८३ हजाराची लाच घेतांना एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष रंगेहाथ पकडुन तिघांवरही अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केल्याची घटना काल,शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी घडली.आलापल्लीच्या महिला वनपरिक्षेत्र अधिकारी ममता राठोड,वनपाल मारोती गायकवाड व वनरक्षक गणेश राठोड असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या वन विभागाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
माहितीनुसार,तक्रारकर्त्यास घरकुल मंजूर झाल्याने बांधकामाकरिता विटांची आवश्यकता भासली. त्यासाठी तक्रारदाराने जवळचे संबंध असलेल्या नागरिकाचे ट्रॅक्टर व मजूर घेऊन वनविभागाच्या नजीकच्या जंगल परिसरातून माती आणायला गेले.मातीचे खोदकाम करीत असतांना वनपाल मारोती गायकवाड याने अटकाव करून ट्रॅक्टर जप्तिसह गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची बतावणी केली.त्यामुळे तक्रारदारासह उपस्थित मजूर घाबरल्याने तक्रारदाराने गुन्हा दाखल करू नये,अशी विनंती केली.विनंती करताच वनपाल मारोती गायकवाड यांनी ट्रॅक्टर जप्ती करून दुसऱ्या दिवशी आलापल्लीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात १ लाख १० हजार रुपये घेऊन येण्यास सांगितले. पैश्याची मागणी केल्याने तक्रारदाराने याबाबत गडचिरोलीच्या एसीबीकडे(लाच लुचपत प्रतिबंधक विभाग)पथकाकडे तक्रार दाखल केली.अशातच एसीबीचे अधिकारी लाचेची पडताळणी करण्याकरिता जात असतांना वनरक्षक गणेश राठोड याने वरिष्ठांना भेटून प्रकरणाचा निपटारा करण्याकरिता तक्रारदारास ३५ हजारांची लाच मागितली.त्यातच तक्रारदार हा वनपरिक्षेत्र अधिकारी ममता राठोड यांच्या कक्षात वनपाल मारोती गायकवाड यास भेटला असता मोठी कारवाई न करता साधी दंडात्मक कारवाई करण्यासाठी मारोती गायकवाड याने १ लाख १० हजारांची मागणी केली.मागितलेली रक्कम मोठी असल्याने तक्रारदारने असमर्थता दर्शविली.त्यामुळे महिला वनपरिक्षेत्र अधिकारी ममता राठोड यांनी तुरुंगवासासह वनगुन्हा दाखल होण्याची भीती दाखवून लाच प्रकरणी प्रोत्साहित केले.तक्रारदार कक्षाच्या बाहेर येताच वनपाल गायकवाड यांनी १ लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली.काल शनिवारी ८ फेब्रुवारीला पुन्हा ममता राठोड हिने तक्रारदारास लाच देण्यास सांगितले.त्यानंतर वनपाल मारोती गायकवाड याने वन परिक्षेत्र अधिकारी ममता राठोड हिच्यासमक्ष १ लाख रुपये स्वीकारुन तक्रारदारास १७ हजार रुपयांच्या दंडाची पावती दिली.म्हणजेच १ लाख रुपयांपैकी १७ हजाराची पावती देऊन ८३ हजाराची लाच स्वीकारल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तिघांवरही अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक दिगंबर प्रधान,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन कदम,संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड,पोलिस निरीक्षक संतोष पाटील,सहायक फौजदार सुनील पेद्दीवार,हवालदार शंकर डांगे,राजेश पद्मगिरवार,किशोर जौंजाळकर,पोलिस नाईक स्वप्नील बांबोळे,संदीप घोरमोडे,संदीप उडाण,प्रवीण जुमनाके, हितेश जेट्टीवार,विद्या म्हशाखेत्री,ज्योत्स्ना वसाके, राजेश्वर कुमरे यांनी केली.
- Advertisement -

