उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील बोधीटोलाजवळ काल,गुरुवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या पोलिस-नक्षल चकमकीत दोन नक्षल्यांचा खात्मा करण्यात जिल्हा पोलिस दलाला यश आहे आहे.यात कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा येथे झालेल्या भूसुरुंग स्फोटामागचा मुख्य सूत्रधार कसनसूर दलमचा उपकमांडर दुर्गेश वट्टी याचादेखील समावेश आहे.छत्तीसगडच्या मोहल्ला मानपूर जिल्ह्यालगत धानोरा तालुक्यातील बोधीटोलाजवळील सीमेवर नक्षल्यांची एक मोठी तुकडी तळ ठोकून असून पोलिस जवानांवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती जिल्हा पोलिसांना प्राप्त झाली होती.माहितीच्या आधारे परिसरात नक्षलविरोधी अभियान राबविण्यात आले असता पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. एक तास चाललेल्या या धुमश्चक्रीनंतर नक्षली जंगलाच्या दिशेने पसार झाले.शोधमोहीम राबविली असता दोन नक्षल्यांचे मृतदेह आढळले.त्यांच्याकडे एके ४७ सह एसएलआर बंदूक आढळून आली. यातील एकाची ओळख पटली असून तो कसनसूर दलमचा उपकमांडर दुर्गेश वट्टी असल्याचे स्पष्ट झाले आहे.२०१९ मध्ये नक्षल्यांनी जांभूळखेडा भूसुरुंगस्फोट घडवून आणला होता.यात गडचिरोली पोलिस दलातील १५ जवान शहीद झाले होते.या स्फोटाचा दुर्गेश वट्टी हा मुख्य सूत्रधार होता.

