उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील कढोली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रामपूर या गावात डेंग्यूचा उद्रेक झाला आहे.एकाच गावात १५ रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण ४ रुग्ण आणि चामोर्शी तालुक्यातील आष्टी ग्रामीण रुग्णालय येथे एकूण ११ रुग्ण उपचार घेत आहेत.
पावसाळ्यापूर्वीच डेंग्यूने डोके वर काढल्याने आरोग्य विभागाच्या साथरोग नियंत्रण उपाययोजना कुचकामी ठरत असल्याचे बोलले जात आहे. रामपूर येथे २२ मे रोजी डेंग्यूचे ३ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रुग्णसंख्येत वाढ झाली.२६ मे अखेरपर्यंत १५ रुग्ण निष्पन्न झाले आहेत.यातील ११ रुग्णांवर आष्टी ग्रामीण रुग्णालय,तर ४ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गावात अजूनही संशयित रुग्णांची शोध मोहीम आरोग्य विभागाकडून केली जात आहे.
यापूर्वीच दोन रुग्णांची प्लेटलेट्स कमी झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर सध्या ११ रुग्णावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आणखी ३ संशयित रुग्ण आष्टी येथे पाठवण्यात आल्याची माहिती आष्टीचे वैद्यकीय अधीक्षक ऋषिकेश बर्डे यांनी दिली आहे.
दरम्यान जिल्ह्यात पर्जन्यमान अधिक असते. त्यामुळे दरवर्षी डेंग्यू मलेरिया यासारख्या आजारांचा धोका अधिक बळावतो.जलजन्य आजारांचीही शक्यता असते, या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून योग्य त्या उपाययोजना राबविणे अपेक्षित आहे. मात्र, पावसाळा सुरू होण्याआधीच डेंग्यूने डोके वर काढल्याने या उपाययोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

