- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्य शासनाने २ जून आणि १५ जुलै २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ जाहीर केली आहे.या योजनेच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील ६ हजार ४२३ शेतकरी पात्र ठरले असून,संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.पात्र शेतकऱ्यांनी लाभ मिळण्यासाठी आपल्या कर्ज खात्याचे बायोमेट्रिक अथवा आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित करण्यात आलेली,३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली अल्पमुदत पीककर्जाची थकीत मुद्दल व व्याजाची रक्कम विचारात घेतली जाणार आहे.पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या कर्ज खात्यातील एकत्रित थकीत मुद्दल आणि व्याजाच्या रकमेवर दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.
सन २०२३-२४ अथवा २०२४-२५ या आर्थिक वर्षांत नियमितपणे किंवा पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीककर्जधारक शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे.अशा शेतकऱ्यांना त्यांनी परतफेड केलेल्या कर्जाच्या रकमेनुसार प्रतिशेतकरी कमाल ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाकडून २४ जुलै २०२६ रोजी प्राप्त झाली. त्यानंतर २५ आणि २६ जुलै रोजी ही यादी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय,संबंधित सहाय्यक निबंधक कार्यालये,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,राष्ट्रीयीकृत, ग्रामीण व व्यापारी बँकांच्या शाखा,प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था तसेच गावपातळीवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या ६ हजार ४२३ शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर कर्जमाफीसंदर्भातील संदेशही पाठविण्यात आला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी संदेशाची प्रतीक्षा न करता प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये आपले नाव तपासावे आणि आवश्यक प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी.
- आधार प्रमाणीकरण अनिवार्य👇
कर्जमुक्तीचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी संबंधित कर्ज खात्याचे बायोमेट्रिक किंवा आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफीची पुढील प्रक्रिया पूर्ण होणार आहे.त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी विलंब न करता जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई-केवायसी व आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे.
शासनाने निश्चित केलेल्या प्रक्रियेनुसार पहिल्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ३१ जुलै २०२६ पासून कर्जमुक्तीचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
- ३ हजार ८१२ खात्यांचे ई-केवायसी प्रलंबित👇
या योजनेंतर्गत बँकस्तरावर ई-केवायसी अथवा आधार प्रमाणीकरण पूर्ण न झालेल्या ३ हजार ८१२ कर्ज खात्यांची स्वतंत्र यादी ग्रामपंचायत कार्यालये, सहाय्यक निबंधक कार्यालये आणि संबंधित बँक शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन तातडीने ई-केवायसी पूर्ण करावी.
कर्जमाफीची रक्कम निश्चित करतांना शासनाने बँकांसाठी ठरवून दिलेल्या ‘हेअरकट’ पद्धतीनुसार थकीत कर्जाची तारीख आणि कालावधी विचारात घेतला जाणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातील थकीत रक्कम निर्धारित प्रमाणात कमी होईल.उर्वरित रक्कम शेतकऱ्यांनी स्वतंत्रपणे बँक खात्यात जमा करण्याची आवश्यकता राहणार नसून, बँकांकडूनही त्या रकमेची मागणी केली जाणार नाही.
जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित राहू नये,यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र,संबंधित बँक शाखा किंवा सहकार विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरण व ई-केवायसीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
- Advertisement -

