- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-अर्जित रजा मंजूर करण्यासाठी तीन हजाराची लाच स्विकरल्याप्रकरणी केंद्र प्रमुख शिक्षकास नांदेड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज,सोमवार १६ फेब्रुवारीला सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास नांदेड जिल्ह्याच्या लोहा पंचायत समिती कार्यालयाच्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयात रंगेहाथ अटक केली.दिगांबर रामचंद्र शिंदे,वय ५७ वर्षे,केंद्र प्रमुख शिक्षक(गट क),मूळ नेमणूक जिल्हा परिषद शाळा,रिसनगाव,ता.लोहा,जि.नांदेड सध्या नेमणूक गटशिक्षणाधिकारी कार्यालय,पंचायत समिती लोहा,जि.नांदेड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
प्रकरणातील तक्रारदार सन २०१८ पासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाद्रा,ता.लोहा,जि.नांदेड येथे प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. तक्रारदारांनी त्यांच्या खाजगी कारणास्तव ९ फेब्रुवारी २०२६ रोजी ४६ दिवसाची अर्जित रजा मंजूरीसाठी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती कार्यालय लोहा, जि.नांदेड येथे अर्ज दिला होता.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिसनगांव, ता.लोहा,जि.नांदेड येथील दिगांबर शिंदे,केंद्र प्रमुख हे पंचायत समिती लोहा कार्यालयाचे आस्थापना विभागामध्ये लिपिकाचे काम तसेच गटशिक्षणाधिकारी व्यवहारे यांचे सर्व कार्यालयीन कामे पाहतात.त्यामुळे तक्रारदार यांनी ११ फेब्रुवारी रोजी त्यांची अर्जित रजा मंजूर झाली की नाही हे पाहण्यासाठी पंचायत समिती लोहा येथील कार्यालयात गेले व केंद्र प्रमुख शिंदे यांची भेट घेऊन त्यांना अर्जित रजा मंजुरी विषयी विचारणा केली.तेव्हा शिदे यांनी तक्रारदार यांना अर्जित रजा मंजूर करण्यासाठी स्वतःसाठी व गटशिक्षणाधिकारी व्यवहारे यांच्यासाठी ४ हजार रुपये द्यावे लागतील, पैसे दिले तरच तुमची अर्जित रजा मंजूर होईल,असे म्हणून तक्रारदार यांना लाचेची मागणी केली.त्यानुसार तक्रारदार यांनी १२ फेब्रुवारी रोजी नांदेडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.
त्यानंतर,१३ फेब्रुवारी रोजी तक्रारदार यांना शासकीय पंचासह गटशिक्षणाधिकारी व्यवहारे यांची भेट घेण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालय,शिक्षण विभाग,पंचायत समिती कार्यालय लोहा येथे पाठविले असता,गटशिक्षणाधिकारी व्यवहारे यांनी तक्रारदार यांना,तुम्ही अगोदर मुख्याध्यापक पदाचा पदभार घेऊन टाका मग तुमची अर्जित रजा मंजूर करतो,असे सांगितले. तेव्हा तक्रारदार हे त्यांचे कार्यालयातून परत निघाले असता,त्यांचे पाठीमागे केंद्र प्रमुख दिगांबर शिंदे हे आले व तुमची अर्जित रजा मंजूर करायची असेल तर मला दोन-तीन हजार रुपये देऊन टाका असे म्हणून लाचेची मागणी केली.तेव्हा तक्रारदार यांनी केव्हा देऊ असे विचारले असता,केंद्र प्रमुख शिंदे यांनी उद्या द्या,परवा द्या,तुमच्या मनाने कधी पण द्या, असे म्हणून स्वतःसाठी ३ हजार रुपये लाचेची मागणी केली.त्यानुसार,आज सोमवार १६ फेब्रुवारी रोजी तक्रारदार यांना शासकीय पंचासह केंद्रप्रमुख दिगांबर शिंदे यांच्याकडे ३ हजार रुपये लाचेच्या रकमेसह गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती,लोहा येथे पाठविले.तेथे तक्रारदार यांनी केंद्रप्रमुख शिदि यांची भेट घेऊन तुम्ही म्हटल्याप्रमाणे ३ हजार रुपये आणले आहेत,असे सांगितले.तेव्हा केंद्रप्रमुख शिंदे यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून तक्रारदार यांची अर्जित रजा मंजूर करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून स्वतःसाठी ३ हजार रुपये लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.
सदरची सापळा कारवाई संदीप पालवे,पोलीस अधीक्षक,अशोक कदम अप्पर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नांदेड परिक्षेत्र,नांदेड यांच्या मार्गदर्शनानुसार ला.प्र.वि.नांदेडचे पोलीस उप अधीक्षक प्रशांत पवार,पोलीस निरीक्षक अनिता चव्हाण व नांदेड युनिट पथक यांनी पार पाडली.
- Advertisement -

