- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-दुचाकींची चोरी करून मिळालेल्या पैशांत मौजमजा,ऑनलाइन गेम व जुगार खेळणाऱ्या तीन व दुचाकी विकणाऱ्या दोन अशा पाच आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने गजाआड करून १९ लाख ७० हजारांच्या ६२ दुचाकी जप्त केल्या आहेत,अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक पोलिस आयुक्त अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.या सर्व दुचाकी त्यांनी मास्टर की वापरून चोरल्या.आकाश किशोर खोब्रागडे वय २५ वर्षे,आकाश संपतलाल परतेकी वय २७ वर्षे आणि मयंक उर्फ क्रिश विनोद बारीक वय १९ वर्षे सर्व रा.सितासावंगी,ता.तुमसर,जि.भंडारा अशी दुचाकी चोरांची नावे आहेत.तर दीपक द्वारकाप्रसाद बिजांडे वय २४ वर्षे आणि त्याचा भाऊ विजय उर्फ गोलू द्वारकाप्रसाद बिजांडे वय ३४ वर्षे दोघे रा.तुमसर, जि.भंडारा अशी चोरीच्या दुचाकी खरेदी करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.यातील आरोपी आकाश खोब्रागडे याने मायनिंगमध्ये डिप्लोमा केला असल्याचे पोलिसांनी
सांगितले.
२६ डिसेंबर २०२४ रोजी यशोधरानगर ठाण्याच्या हद्दीत भिलगाव येथील वंडर बारजवळील नाल्याच्या पुलावर प्रज्ज्वल जयदत्त भिमटे वय २५ वर्षे,रा.पवन नगर यांनी त्यांची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी उभी केली असता अज्ञात आरोपीने ती चोरून नेली होती.तसेच,९ नोव्हेंबर २०२४ रोजी यशोधरानगर ठाण्याच्या हद्दीत मेट्रो स्टेशनच्या पार्किंगमध्ये अर्पण चंद्रमणी मेश्राम वय २२ वर्षे,रा.खसाळा,कपिलनगर यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एम. एच.४०,वि.डी-२६६५ अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
दोन्ही घटनांत यशोधरानगर पोलिसांनी कलम ३०३ (२) नुसार गुन्हे दाखल केले होते.गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने तांत्रिक तपास करून २०० ठिकाणचे दोन्ही सीसीटीव्ही फुटेज तपासून गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार,२१ फेब्रुवारीला आरोपी आकाश खोब्रागडेला ताब्यात घेतले.त्याची सखोल चौकशी केली असता,त्याने आपले साथीदार आकाश परतेकी,मयंक उर्फ क्रिश बारीक यांच्यासोबत मागील ७ महिन्यांत मास्टर कीच्या मदतीने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.चोरी केलेल्या दुचाकी आपण तुमसर येथील दीपक बाइक रिपेअरींगचा मालक दीपक व विजय उर्फ गोलू यांना विकल्याची माहिती दिली.आरोपी आकाश खोब्रागडेच्या अंगझडतीत २ मास्टर की,मोबाइल आढळला.त्यानंतर गुन्हे शाखा पोलिसांनी चोरीच्या दुचाकींची विक्री करणारे आरोपी दीपक बिजांडे व विजय उर्फ गोलू बिजांडे यांना ताब्यात घेतले.आरोपी गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवून दुचाकींची चोरी करीत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.यात स्प्लेंडर प्लस दुचाकी चोरी करण्यावर आरोपी भर देत होते. दुचाकी चोरी केल्यानंतर वाहनांचे क्रमांक, इंजिन व चेसीसमध्ये बदल करून ते दुचाकींची विक्री करीत होते.पत्रकार परिषदेला युनिट ५ चे निरीक्षक राहुल शिरे,युनिट ३ चे निरीक्षक मुकुंद ठाकरे उपस्थित होते.
- Advertisement -

