- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-सेवानिवृत्तीला काही दिवस उरलेले असतांना सेवानिवृत्तीची कागदपत्रे तयार करून देण्यासाठी ५० हजाराची लाच मागून ४५ हजार रुपये स्विकारल्याप्रकरणी गोंदिया जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा विभागातील कनिष्ठ लिपिकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.संदेश सांबरे असे लाचखोर कनिष्ठ लिपिकाचे नाव असून त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणातील तक्रारदार हे गोंदिया जिल्हा परिषदेत कर्मचारी पदावर कार्यरत असून ते येत्या,३१ मे २०२६ रोजी सेवानिवत्त होणार आहेत.सेवानिवृत्तीचा लाभ लवकर मिळावा,यासाठी तक्रारदार यांनी वित्त व लेखा विभागातील कनिष्ठ लिपिकास सेवानिवृत्तीची कागदपत्रे तयार करून देण्याची मागणी केली.दरम्यान,७ मे रोजी आरोपी संदेश सांबरे याने तक्रारदार यांच्याकडे सेवानिवृत्तीची कागदपत्रे लवकर तयार करून देण्यासाठी व त्यांच्या प्रकरणात पे फिक्सेशन बरोबर नसून त्यांच्यावर १ लाख ९२ हजार रुपयांची रिकव्हरी निघत असल्याचे सांगून सदर रिकव्हरी वाचवून देण्याच्या नावावर तब्बल ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र,तक्रारदारांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी काल सोमवारी गोंदिया येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली.तक्रारीच्या आधारे पथकाने काल दुपारच्या सुमारास सापळा कारवाई केली.यात आरोपी संदेश सांबरे याने तडजोडीअंती ४५ हजार रुपये स्विकारण्याची तयारी दर्शवली.लाच स्वीकारताच पथकाने रंगेहाथ अटक केली. एसीबीची धाड पडल्याची माहिती जिल्हा परिषद कार्यालयात होताच एकच खळबळ माजली.सदरची कारवाई पोलिस निरीक्षक उमाकांत उगले,अरविंद राऊत, सहाय्यक फौजदार चंद्रकांत करपे,पोलिस हवालदार संजय बोहरे,मंगेश काहालकर,पोलिस नाईक संतोष शेंडे, अशोक कापसे,संतोष बोपचे,प्रशांत सोनवणे,कैलाश काटकर यांच्या पथकाने केली.
- Advertisement -

