उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- सोन्याची गुणवत्ता प्रमाणित करण्यासाठी दागिन्यांवर हॉलमार्क बंधनकारक आहे. तरीदेखील राज्यात काही ठिकाणी बनावट हॉलमार्क लावून सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जात असल्याची माहिती भारतीय मानक ब्युरोला ( बीआयएस ) मिळाली. त्यानुसार ‘बीआयएस’ने नागपूर, मुंबई, पुणे, ठाणे येथे एकाचवेळी धाड टाकून कारवाई केली. यामध्ये नकली हॉलमार्कचा होलोग्राम असलेले सुमारे १ कोटी ५ लाखांचे २.७५ किलो दागिने जप्त करण्यात आले. ‘बीआयएस’ने ठरवून दिलेली गुणवत्ता आणि निकषांची पूर्तता न करताच राज्यात हॉलमार्कचा नकली होलोग्राम लावून सोन्याची दागिने विक्री करणाऱ्यांविरोधात ही मोहीम सुरु करण्यात आली आहे.कारवाई अंतर्गत सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या शुद्धता प्रमाणपत्रासाठी हॉलमार्कचे उल्लंघन करणाऱ्यांवर राज्यात कारवाई केली जात आहे. नागपूर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी ‘बीआयएस’च्या केंद्रांवर याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. बीआयएसची गुणवत्ता तपासणी केंद्रे असतानाही नकली हॉलमार्क लागतोच कसा? मग, ही केंद्रे काय कामाची, असा सवाल रोकडे यांनी केला आहे.
भारत सरकारने दागिन्यांवर हॉलमार्कच्या नियमांमध्ये केलेली सुधारणा १ जुलै २०२१ पासून देशभर लागू केली आहे.नवीन नियमांनुसार, दागिन्यांवर हॉलमार्किंगचे एकूण ३ गुण आहेत. पूर्वी हे चार ते पाच असायचे.तीन गुणांमध्ये हॉलमार्क, शुद्धता ग्रेड आणि ६ अंकी अल्फान्यूमेरिक कोड असतात.
सोन्याच्या दागिन्यांवरील ‘एचयूआयडी’ कोड
६ अंकी अल्फान्यूमेरिक कोडला ‘एचयूआयडी’ म्हणतात.यामध्ये अक्षरे तसेच अंकांचा समावेश होतो. नवीन नियमांनुसार,देशात निर्मित प्रत्येक सोन्याच्या दागिन्यांना एक युनीक ‘एचयूआयडी’ कोड दिलेला आहे.यामुळे दागिन्यांची शुद्धता तपासण्यात मदत होते.