- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-चारित्र्यावर संशय तसेच हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आजनी येथे नुकतीच घडली.या प्रकरणात पोलिसांनी तिच्या पतीसह तिघांना अटक केली असून,आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
विद्या अमोल लिल्लारे असे मृत महिलेचे नाव असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तिचा पती अमोल महादेव लिल्लारे,भासरा महेश महादेव लिल्लारे व जाऊचा समावेश आहे.हे सर्वजण आजनी, ता.रामटेक,जि.नागपूर येथील रहिवासी आहेत.विद्या व अमोल यांचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता. चारित्र्यावर संशय व पैशाची मागणी यावरून अमोल तिला सतत त्रास द्यायचा.मध्यंतरी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सजन डहारे व सरपंच बिरनवार रंगलाल नागपुरे यांच्या समक्ष झालेल्या बैठकीत त्या दोघांमध्ये समझोता घडवून आणला होता.पुढे अमोलने तिला ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी माहेरहून चार लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता. त्याने तिचे सोन्याचे मंगळसूत्र व इतर दागिने हिसकावून घेतले होते.माहेरी गेल्यावर तिने संपूर्ण प्रकार आई वडिलांना सांगितला होता.त्यामुळे वडिलांनी मोहाडी (जि.भंडारा) पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.त्यानंतर ती परत सासरी आली.तिला प्रियांशी नावाची छोटी मुलगी देखील आहे.घटनेच्या दिवशी विद्या पती,भासरा व जाऊ यांच्या जेवणाचा टिफिन घेऊन शेतात गेली.त्यानंतर ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली असता, तिच्याच शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला.
याप्रकरणी रामटेक पोलिसांनी विद्याचे वडील लखाराम कन्हैयालाल शेंडे रा.खुटसावळी,ता.मोहाडी, जिल्हा भंडारा यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ कलम ८०,८५ व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत काळे करीत आहेत.
अमोल सुरुवातीपासून विद्याच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा.त्यामुळे तो तिला वारंवार शारीरिक व मानसिक त्रास द्यायचा.त्याने तिला साक्षगंधात भेट दिलेला मोबाइल फोन हिसकावून घेतला होता.ती अधूनमधून लपूनछपून आपल्याला फोन करायची आणि तिला होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाची माहिती द्यायची.या संपूर्ण प्रकरणात भासरा व जाऊ सहभागी आहेत; अशी माहिती तिचे वडील लखाराम शेंडे यांनी पोलिसांना दिली.
पुन्हा त्रास सुरू झाल्याने ती मंडई हमलापुरी,ता. रामटेक येथे तिचा मामा मेघराज ठकरेले यांच्याकडे गेली होती.मामाने समजूत काढून तिला सासरी नेऊन पोहोचविले.२९ नोव्हेंबर रोजी पती,भासरा व जाऊने तिला मामासमोर छाती व पोटावर बेदम मारहाण केली होती.त्यावेळी मामाने तिला माहेरी जाण्याची सूचना केली होती.
- Advertisement -