उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- धनादेश(चेक)अनादर झाला व त्याबाबत न्यायालयात तक्रार दाखल झाली तर तक्रारकर्त्यास आरोपीकडून धनादेशातील रकमेच्या २० टक्के रक्कम अंतरिम भरपाई म्हणून द्यावी लागेल.असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच एका प्रकरणामध्ये दिला आहे.सदर प्रकरण चंद्रपूर येथील असून सादर प्रकरणामध्ये तक्रारकर्त्याला आरोपीकडून १२ लाख २१ हजार ९६५ रुपये डिझेलच्या विक्री पोटी घेणे होते.
चंद्रपूर येथील व्यावसायिक पीयूष जैन हे पेट्रोल पंप मालक असून आरोपीकडून डिझेलच्या विक्री पोटी आरोपीने धनादेश दिला होता.मात्र,तो वटला नाही. तक्रारकर्त्याने न्यायदंडाधिकारी चंद्रपूर येथे कलम १३८ नुसार तक्रार दाखल केली व सादर प्रकरणात धनादेशाचे २० टक्के रक्कम मिळण्यास अर्ज केला. सदर अर्ज चंद्रपूर न्यायालयात मान्य झाला व आरोपीला २० टक्के रक्कम देण्याचा आदेश न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिला. या आदेशास आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते.सदर खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती गोविंद सानप यांच्यापुढे झाली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून तसेच विविध बाजूंचा विचार करून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तक्रारकर्त्याचे म्हणणे मान्य करीत न्यायदंडाधिकारी चंद्रपूर यांचा निर्णय कायम ठेवत आरोपीला तक्रारकर्त्यास २० टक्के रक्कम अंतरिम भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला. तक्रारकर्त्याच्या बाजूने ॲड.अभिजित वाघ यांनी बाजू मांडली.