उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यातील सामूहिक वनहक्कांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करणे व त्याची अंमलबजावणी करण्याकरिता शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी संजय मीना यांनी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामपंचायतीतील गावांना समित्या गठीत करण्याचे आदेश दिल्यानंतर; जिल्हा स्तरावरील महिला आर्थिक विकास महामंडळामधे गावातील समित्यातील अध्यक्ष,सचिव व सदस्य यांच्या ७ दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत असल्याने सामूहिक वनहक्क प्राप्त गावांना नवसंजीवनी मिळाली आहे.
मागील कित्येक वर्षांपासून जिल्ह्यातील गावांना सामूहिक वनहक्क मिळाले आहेत.परंतु,त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने मिळालेल्या अधिकारापासून वंचित राहावे लागत होते.गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम,आदिवासीबहुल,नक्षलग्रस्त आहे. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी लोक मुख्यत्वे वनावर अवलंबून असल्याने; त्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता कायदा मंजूर करण्यात आला आहे.सामूहिक वनहक्क प्राप्त क्षेत्राचे संवर्धन संरक्षण करून त्यातून मिळणाऱ्या शाश्वत वन उत्पादनातून,त्याचप्रमाणे मिळालेल्या मालकी स्वामीत्व हक्कातून जीवनमान उंचवावे, हाच मुख्य हेतू आहे.
सामूहिक वनहक्क प्राप्त गावांतील प्रमुख कामे
सामूहिक वनहक्कप्राप्त गावांचे संरक्षण व व्यवस्थापन आराखडे तयार करणे,संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करणे, अंमलबजावणी करणे,समितीचे सनियंत्रण करणे,समितीचा आढावा घेणे,ग्रामसभा व सामूहिक व्यवस्थापन समिती सदस्यांना क्षमता वृद्धी प्रशिक्षण देणे,आराखडे तयार करण्यासाठी विविध शासकीय योजनांची माहिती व शासकीय सेवा ग्रामस्तरीय समितीला उपलब्ध करून देणे व इतर सार्वजनिक रोजगार निर्मितीवर भर देणे; अशी प्रमुख कामे यामार्फत केली जाणार आहेत.