उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात शासकीय व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा एक अनोखा व आगळा-वेगळा प्रकार हल्ली पहावयास मिळतो आहे.चक्क शासकीय कामकाजाच्या वेळेस साईटवर वा इतर सार्वजनिक कामांचा बहाणा करून कार्यालयातून बाहेर पडणारे काही कर्मचारी डायरेक्ट विदेशी वा इतर मद्य पिण्याकरीता बारमध्ये बसून दारू ढोसत असल्याने यांवर कुणाचा वचपा राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात १९९३ पासून दारू बंदीला सुरूवात झाली.मात्र जिल्ह्याच्या सिमांना जवळच लागून असलेले चंद्रपूर,भंडारा आणि गोंदिया अशी तिन्ही जिल्ह्यात दारू बंदी नसल्याने त्याठिकाणी लायसेन्स धारक बार च्या माध्यमातून दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे.याचाच फायदा गडचिरोली जिल्ह्यातील काही दारू पिण्याचे शौकीन असणारे शासकीय व कंत्राटी कर्मचारी घेतांना दिसून येत आहेत.साईटवर वा इतर ठिकाणी कामा निमित्त जाण्याच्या बहाण्याने कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेस दारूचे शौकीन असणारे शासकीय व कंत्राटी कर्मचारी तासंन तास बार मध्ये बसून गप्पा-गोष्टी झोडून दारूचा ठर्रा मारतांना आढळून येतात.
खरे म्हणजे शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणारी हलचल पंजी नोंदवही नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने कुठेही जा व काहीही करा; असे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे.बारमध्ये दारूचा ठर्रा मारणाऱ्या व तासंन तास बार मध्ये बसणाऱ्या शासकीय व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा भांडाफोड करावयाचे असल्यास बार मधील सी सी टिव्ही फुटेज तपासल्यास मोठा खुलासा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.शासकीय कामकाजाच्या वेळेस चक्क बार मध्ये दारूचा ठर्रा मारणाऱ्या दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होणार नाही; तोपर्यंत अशीच अवस्था पहावयास मिळणार असल्याचे बोलले जाते आहे.