संपादक/सत्यवान रामटेके
उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने दिवसा उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. अशातच शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील सिमेंट-काँक्रिट रस्ते हे दिवसभर तापलेल्या उन्हामुळे उष्णतेचे वातावरण पसरवू लागले आहेत.त्यामुळे नागरिकांचा जीव कासावीस होऊ लागला आहे. सिमेंट-काँक्रिट रस्ते बांधकामांमुळे अनेक ठिकाणच्या भूजल पातळीत घट झाली असल्याचे निदर्शनास येऊ लागले असल्याने मजबूत,टिकाऊ व वर्षानुवर्षे रस्ते दुरुस्तीची झंझट दूर करण्याच्या नादात अनेकजण विसरून गेलेत की,सिमेंट-काँक्रिट रस्ते बांधकाम हे भविष्यात नाही तर सध्याच्या परिस्थितीतच घातक ठरू लागले आहेत.
सध्याच्या काळात शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातही सिमेंट-काँक्रिट रस्ते बांधकामांचा कल वाढलेला दिसून येतो.ग्रामीण भागात रस्ते बांधकाम म्हटले तर ‘गल्ली ते दिल्ली’अशी अवस्था निर्माण झाली आहे.बांधकामांसाठी भविष्यात गावातील रस्तेच अपुरे पडणार की काय? असा प्रश्न पडला आहे.अनेकजण सिमेंट-काँक्रिट रस्ते बांधकाम करण्यासाठी अती उतावळेपणा करतांना दिसून येतात.महत्वाचे म्हणजे ‘सत्तर तिथे बाहत्तर’ लावण्यास अनेकजण माहीर झालेले आहेत.त्यामुळे ‘चलता है चलने दो; हमको मिलता है मिलने दो’ असे दिसून येत आहे.शासन स्तरावरून सिमेंट-काँक्रिट रस्ते बांधकामाचा निर्णय योग्य जरी वाटत असला तरीही त्याचे भुगतान सर्व सामान्य जनतेलाच करावे लागणार आहे.उन्हाळ्याच्या दिवसांत तापमानात जस-जशी वाढ होत जाते; तस-तसे सिमेंट-काँक्रिटचे रस्ते उष्ण होऊ लागतात व सर्वत्र परिसरात उष्णतेची लाट पसरली जात आहे.गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना याचा सर्वात जास्त फटका बसतांना दिसून येत आहे.सायंकाळच्या सुमारास उष्ण झालेले सिमेंट-काँक्रिटचे रस्त्यांची गरम भाप मारू लागली आहे.

पूर्वी सिमेंट-काँक्रिट रस्ते बांधकामे नसल्याने मुख्य रस्ता,गावातील अंतर्गत रस्ते,गावा बाहेरील रस्ते व इतर रस्त्यांवरून पावसाळ्यातील पाणी काही प्रमाणात जमिनीमध्ये मुरून पाण्याच्या भूजल पातळीत वाढ व्हायची; मात्र हल्ली सिमेंट-काँक्रिट रस्ते बांधकामांचा ट्रेण्ड वाढल्याने जमिनीमध्ये पाणी मुरण्या ऐवजी रस्त्यांवरील पाणी नाली बांधकामाच्या सहाय्याने कुठल्या तरी तलावात वा इतर ठिकाणी साचून राहू लागले आहे.त्यामुळे संपूर्ण गावातील भूजल पातळी वाढणे अशक्य आहे.एखाद्या नागरिकाने पाण्यासाठी बोरवेल मारण्याचा प्रयत्न केला; तर पाण्याची पातळी खोलवर जाऊन बोरवेलला पाणी न लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे सिमेंट-काँक्रिट रस्ते बांधकाम हे नागरिकांसाठी घातकच ठरू लागले आहेत.
मजबूत व जास्त कालावधी करीता टिकाऊ; या उद्दशाने बांधकामे जरी केली जात असली तरी हल्ली सिमेंट-काँक्रिट रस्ते बांधकामांची अवस्था बघितली तर निकृष्ट दर्जाची बांधकामे करण्याचा सपाटा अनेकांनी चालविला आहे.काहीजण सिमेंट-काँक्रिट रस्ते बांधकामांसाठी कपडे धुण्याचा निरमा,सिमेंटचे बिल वेगळे व प्रत्यक्षात वापरलेले सिमेंट दुसरेच,रेतीचा वापर जास्त तर सिमेंट गीट्टीचे प्रमाण कमी,काही रस्ते एका वर्षातच उखडून गीट्टी वर येऊन डोके वर काढून पाहू लागली आहे.खरोखरच सिमेंट-काँक्रिट रस्ते बांधकाम योग्य की अयोग्य? असा प्रश्न निर्माण झाला आहे.