उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- अवैध दारू विक्री,भांडण,तंटे,विनयभंग असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या पाच आरोपींना केशोरी पोलिसांनी एक महिन्यासाठी गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी ही कारवाई केली आहे.केशोरी पोलिस ठाण्याच्या परिसरातील गणेश मुखरू कांबळे (रा.प्रतापगड ),महेश मिश्रीलाल राठी,धनंजय संतोष राठी,जितेंद्र तुळशीराम गजभिये,सिंधू जितेंद्र गजभिये (सर्व रा. गोठणगाव) यांना एक महिन्यासाठी तडीपार करण्यात आले त्यांच्याविरुद्ध वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनसुध्दा त्यांच्यात सुधारणा झाली नाही.
या गुन्हेगारांच्या कृतीमुळे परिसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी कलम ५६ (अ), (ब) महाराष्ट्र पोलिस अधिनियम अन्वये प्रस्ताव उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वरूण शहारे यांच्याकडे केला होता.उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांनी हद्दपार प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून या गुन्हेगारांना जिल्हा हद्दीतून तडीपार करण्याची शिफारस केली होती.
या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी शहारे यांनी सर्व ५ जणांना एक महिन्यापर्यंत गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.हद्दपार कारवाईमुळे अवैध कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.केशोरी पोलिस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी केलेल्या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे,अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे.