उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- नागपूरमध्ये पोषण आहारामध्ये मृत चिमणी आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये मृत चिमणी आढळल्यामुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पोषण आहारात मृत चिमणी आढळल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. पोषण आहार पुरवठा धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,नागपूर जिल्ह्यात पोषण आहारामध्ये चिमणी आढळली आहे.नागपूरात पारशिवानी तालुक्यातील घाट रोहना गट ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार घडला आहे. लहान मुलांच्या आहारात मृत चिमणी आढळल्याने खळबळ उडाली आहे.निल नेहाल शिंदेकर यांच्या घरी देण्यात आलेल्या पोषण आहारात ही मृत चिमणी आढळली आहे.० ते ३ वयोगटातील मुलांना हा पोषण आहार दिला जात होता.
पोषण आहारामध्ये मृत चिमणी आढळल्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.जिल्हा परिषद सीईओ, अध्यक्ष, उपाध्यक्षाने ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी यासंदर्भात निवेदन दिले आहे. या निवेदनाद्वारे पोषण आहार पुरवठा धारकांवर आणि दोषींवर कारवाई करत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

