उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी :- तालुक्यातील खरकाडा-रणमोचन येथील शेतकऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत मार्गावरून जाणाऱ्या रेतीचे ट्रक,ट्रॅक्टरची अडवणूक केली.तालुक्यातील रणमोचन रेतीघाटाचा लिलाव झाला असल्याने रेतीघाटावरून दररोज ४० ते ५० ट्रक,ट्रॅक्टर रेती भरून रनमोचन गावाकडून खरकाडाकडे जात असतात.शेती वाहतुकीच्या रस्त्यावरून रेतीने भरलेले मोठे ट्रक,ट्रॅक्टर दिवस-रात्र वाहतूक करीत आहेत.वाहनांची धूळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतांमधील पिकांवर बसत असल्याने शेतात असलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
सदर नुकसानीबाबत रेती घाट व्यवस्थापनाला वारंवार सूचना देऊनही यावर तोडगा न निघाल्याने शेवटी शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले.यामुळे रेती भरलेल्या ट्रक,ट्रॅक्टर यांच्या रांगाच-रांगा लागलेल्या होत्या.शेतकरी बांधवांच्या शेतातील होणाऱ्या पिकांचे नुकसान थांबविण्यासाठी प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी;अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.