उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- छत्तीसगड आणि गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या अनेक चकमकींमध्ये सहभागी राहिलेल्या आणि नक्षल्यांना स्फोटकांसह अन्य साहित्य पुरवठा करणाऱ्या उपकमांडरला पोलिसांनी आज सकाळी जारावंडी-मोहगाव मार्गावरील कुरमावडा फाट्याजवळून अटक केली.चैनुराम उर्फ सुक्कू वत्ते कोरसा (वय ४८) असे अटकेतील नक्षल्याचे नाव आहे.तो छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यातील टेकामेटा येथील रहिवासी होता.शासनाने त्याच्यावर १६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की,चैनुराम कोरसा हा गडचिरोली जिल्हा आणि छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील जारावंडी आणि पेंढरी या दोन पोलिस ठाण्यांचा घातपात करण्याच्या हेतूने रेकी करीत होता.याबाबत माहिती मिळाल्यानंतर विशेष अभियान पथकाच्या जवानांनी त्यास कुरमावडा फाट्याजवळ अटक केली.
चैनुराम कोरसा हा जून २००० मध्ये छत्तीसगडमधील पर्लकोटा दलममध्ये भरती झाला.पुढे २००३ पर्यंत तो एसीएम पदावर होता.त्याचवर्षी त्याला विभागीय समिती सदस्य बनविण्यात आले.२०१४ पर्यंत तो त्याच पदावर नक्षल्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अबुझमाड डिव्हीजनमध्ये कार्यरत होता.त्यानंतर त्याला पदावनत करुन पुन्हा एसीएम बनविण्यात आले.पुढे नोव्हेंबर २०१६ ला चैनुरामला नक्षल्यांच्या पुरवठा समितीचा विभागीय समिती सदस्य आणि उपकमांडर बनविण्यात आले.मागच्या सहा महिन्यांत चैनुरामने नक्षल्यांना स्फोटके आणि अन्य साहित्याचा पुरवठा केला होता.२०२२ पासून आतापर्यंत पोलिसांनी ७१ नक्षल्यांना अटक केली आहे; अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. पत्रकार परिषदेला अपर पोलिस अधीक्षक अनुज तारे व कुमार चिंता उपस्थित होते.चौनुराम कोरसा याने आपल्या कार्यकाळात ७ चकमकींमध्ये सहभाग घेतला.२००९ मध्ये छत्तीसगड राज्यातील पुंगड,बालेवाडा व बाशिंग,२०१० मध्ये गरपा,२०११ मध्ये कोल्हार येथे झालेल्या चकमकी आणि ऍम्बुशमध्ये तो सहभागी होता.२०१० मध्ये चैनुरामने कोंगाल येथील एका इसमाचा खून केला होता.२०२० मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील पोयारकोठी येथील चकमकीतही तो सहभागी होता. या चकमकीत गडचिरोली पोलिस दलातील एक उपनिरीक्षक आणि एक अंमलदार शहीद झाले होते. शिवाय २०२३ मध्ये हिक्केर येथे झालेल्या चकमकीतही त्याने सहभाग घेतला होता.याच चकमकीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे.राज्य शासनाने त्याच्यावर १६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते; अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.