उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- नागपुरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.मागील महिन्यात नागपूर रेल्वे स्थानकावर ६ अल्पवयीन मुलांसमवेत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते.त्यानुसार यांना आरपीएफ आणि ‘बचपन बचाओ संस्थे’च्या प्रतिनिधींनी ताब्यात घेतले होते.त्यानंतर पुढील कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.या प्रकरणात मानवी तस्करी करून ही सर्व मुले बिहारमधून आणल्याचे लोहमार्ग पोलिसांनी तपासादरम्यान उघड केले आहे.या प्रकरणी पोलिसांनी शंभू आणि विकास नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर मिळालेल्या मुलांचे चाइल्ड लाइन टीमकडून समुपदेशन केले जाणार आहे.तसेच त्यांची कागदपत्रे तपासून त्यांचे नेमके वय जाणून घेऊन त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल.
आरोपींनी मुलांच्या नातेवाईकांना भुरळ घालून सुरुवातीला ५०० ते १००० रुपये देऊन पेपर मिलमध्ये काम करण्यासाठी मुलांना नेत असल्याचे कारण सांगून मुलांची बिहारमधून नागपुरात तस्करी करण्यात आली व नंतर ही मुले अन्य टोळीतील सदस्यांच्या ताब्यात देण्यात आली होती.मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना महिन्याला १० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवायचे व मुलां कडून मजुरीची कामे करवून घेतली जात होती.मुलांची तस्करी प्रकरणी मुख्य म्होरक्या कोण?याचा पोलीस शोध घेत आहेत.