- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र भीषण अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.आपण आपल्या साईडने जात असो वा कितीही नियंत्रित वाहन चालवण्याचा प्रयत्न करीत असलो,तरीही समोरील वाहन चालक बेदरकारपणे वाहन चालवून एखाद्याचा जीव घेतल्याशिवाय राहत नाही. अश्याच प्रकारे आज,गुरुवार ४ जून रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील आलदांडी गावाजवळ भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.एका चारचाकी वाहनाने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एका तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.अनिल हिचामी वय २८ वर्षे असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे,तर बालाजी दुर्वा असे गंभीर जखमी झालेल्या सहकाऱ्याचे नाव असून हे दोघेही रा.परसलगोंदी,ता.एटापल्ली, जि.गडचिरोली येथील रहिवासी आहेत.अपघातात गंभीर जखमी झालेल्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारार्थ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अनिल व बालाजी दुचाकीने प्रवास करत असतांना आलदांडी गावाजवळ जाताच एमएच ३४ सीडी ०८०० क्रमांकाच्या इनोव्हा क्रिस्टा वाहनाने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोघेही दूरवर फेकल्या गेले आणि दुचाकी चक्काचूर झाली.यात अनिल हिचामी घटनास्थळीच मृत पावला.तर अपघातात गंभीर जखमी बालाजी दुर्वा यास तात्काळ एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.तिथे प्राथमिक उपचारानंतर गडचिरोली रुग्णालयात हलविण्यात आले असून उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच आलदांडी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला व पुढील तपास सुरू केला आहे.
- Advertisement -

